Pankaja Munde : परळीच्या (Parli) विकासासाठी माझी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी असल्याचे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही जात, धर्म, पक्ष बघितला नाही. कोणताही द्वेष मनात ठेवला नाही. कारण तुमचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. ते ऋण फेडण्याचे काम आम्ही करत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
सामान्य माणसाच्या हितासाठी, वंचितांसाठी वाली बनण्यासाठी आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून काम करु असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तीन राज्यामध्ये भाजपचे सरकार आले आहे. त्या राज्यातील काही योजना आहेत, त्या योजना आपण आणाव्यात, तसेच आरक्षणाचा प्रश्न असेल याबाबत तोडगा काढावा अशी विनंती पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना केली.
शिंदे-फडणवीस-पवार एका मंचावर, त्यामुळं वातावरण गरम
थंडीच्या दिवसात जास्त गरम होत आहे. कारण शिंदे-फडणवीस-पवार एका मंचावर आले आहेत. याहीपेक्षा जास्त गरमी यामुळं वाढली आहे की, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड जिल्ह्यातील परळी जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. मागील वर्षभरात यापूर्वी दोन वेळा देवेंद्र फडणवीस हे बीडला आले होते. मात्र दोन्हीवेळी पंकजा मुंडे अथवा भाजप खासदार प्रीतम मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्या नव्हत्या. मात्र, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार येत असताना पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमात पाहायला मिळाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे परळीत कार्यक्रमात एकत्र आले होते. परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व नेतेमंडळी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी, सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ झाला. अनेक पूर्ण कामांचे लोकार्पण देखील करण्यात आलं. तसेच विविध शासकीय योजनांच्या जिल्ह्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना थेट लाभाचे वितरण देखील करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या: