Grass Carpet : देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिच्याची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजिरवाडी जवळील पेठ नायगाव येथे या पर्यावरणप्रेमींनी गालिचा बनवण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन या गालिच्याची निर्मिती करण्यात आली आहे. लोकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.
प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीचे जिबॉय तंबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये, नैसर्गिक पर्यावरणासाठी उत्तम असलेल्या गवतापासून गालिचा बनविला जातो. या गालिच्यांचा वापर फक्त घरासाठीच नाही तर क्रिडांगणासाठी देखील करण्यात येऊ शकणार आहे. याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी लागणारा खर्च देखील कमी प्रमाणात येणार आहे. दोन दिवसातून एकदा पाणी घातल्याने हा गालिचा ताजा राहतो. त्यामुळे पाणी देखील कमी प्रमाणात लागणार आहे.
गालिचा निसर्गासाठी आणि मानवासाठी देखील उपयुक्त
संपूर्णपणे नैसर्गिक असलेला हा गालिचा निसर्गासाठी आणि पर्यावरणाचं जतन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अनेक गालिच्यांमुळे पर्यावरणात वेगवेगळे वायु पसरण्याची भीती असते मात्र या गालिच्यामुळे नैसर्गिक वायु सगळीकडे असणार आहे. तसंच मानवासाठी देखील या गालिच्याचे अनेक फायदे आहे. शुद्ध हवा निर्मिती होण्यास मदत होत असल्याने श्वसनाचे आजाराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे शिवाय अनवाणी पायाने या गालिच्यावर चालल्यास अनेक आजारांपासून दूर राहण्यास देखील मदत होणार आहे. पुणे, केरळ, कोचीन, आंध्र प्रदेश, हैदराबाद या शहरांत गालिच्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.
प्लॅंटर्स कंपनी मार्फत तयार केला जातोय हा गालिचा
प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीचे जिबॉय तंबी यांची केरळमध्ये प्लॅंटर्स नावाची कंपनी आहे. ती कंपनी पर्यावरणपूरक अनेक गोष्टीसाठी काम करते. ते नवीन प्रकारचे गवत, स्थानिक वनस्पती आणि बी बर्ड बटरफ्लाय गार्डनिंग (BBB) तयार करतात. बफेलो ड्वार्फ ग्रास ही त्यांची प्रमुख निर्मिती आहे. हे लँडस्केपिंग गवत म्हणून लोकप्रिय होत आहे. प्राण्यांसाठी देखील हे गवत उपयुक्त आहे. स्थानिक वनस्पती, स्थानिक हवामान आणि मातीच्या परिस्थितीशी हे गवत जुळवून घेतात. त्यामुळे स्थानिक परिसरात या वनस्पती नैसर्गिकरित्या उगवतात. हवामानचा अंदाज आणि स्थानिक हवामानाला साजेसं असं गवत तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला असल्याचं प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीचे जिबॉय तंबी यांनी सांगितलं आहे.