Chief Minister Eknath Shinde visit to Marathwada: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पासून दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहे. मात्र त्यांच्या या शासकीय दौऱ्यात कुठेही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येणार असल्याचा उल्लेख नाहीये. तर मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून, तेथूनच मुख्यमंत्री सर्व परिस्थिती जाणून घेणार आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही गुडघाभर पाणी असतांना त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना एसी कार्यालयात बसून कशा कळणार असा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे याच दोन दिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय सभांना हजेरी लावणार आहे.
मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार माजला आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यात तर भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. त्यामुळे याच दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या व्यथा बांधावर जाऊन मुख्यमंत्री समजून घेतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या या दोन दिवसीय दौऱ्यात कुठेही नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री करणार असल्याचा उल्लेख नाहीये. तर मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे हे औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीतून घेणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शासकीय कार्यालयात बसून शेतकऱ्यांच्या व्यथा खरचं कळणार आहे का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
'एसी' कार्यालयात बसून आढावा घेणार का?
एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतेत आहे, दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री सत्कार सोहळ्यात व्यस्थ आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सहानुभूती देण्याची गरज असताना मुख्यमंत्री मात्र एसीत बसून आढावा घेणार आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
आमदारांसाठी वेळ पण शेतकऱ्यांसाठी नाही?
बंडखोर आमदार रमेश बोरनारे आणि अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय सभा होणार आहेत. तर आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे आणि अतुल सावे यांच्या कार्यालयाला सुद्धा मुख्यमंत्री भेट देणार आहे. पण एकीकडे आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे आणि दुसरीकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी मात्र मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसावा अशी टीकाही विरोधकांकडून केली जात आहे.
अजित पवारांचाही मराठवाडा दौरा...
एकीकडे आज पासून मुख्यमंत्री दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते अजित पवार सुद्धा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. अजित पवार यांच्याकडून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत, शेतकऱ्यांच्या व्यथा अजित पवार अजित पवार जाणून घेणार आहेत.
शेतकऱ्यांचं मदतीकडे लक्ष...
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात झालेय. त्यामुळे मराठवाडा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आढावा बैठकीनंतर मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून कितपत दिलासा मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.