Aurangabad News: औरंगाबाद शहरातील खाम नदीच्या इको पार्कमध्ये पुढाऱ्यांच्या नावाने उद्यान उभारण्यात आले. पण हे उद्यान एका वर्षातच बकाल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी (Aurangabad Smart City) अंतर्गत लाखो रुपये खर्च करून हे उद्यान उभारण्यात आले होते. तर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित मोठा गाजावाजा करत या उद्यानाचे उद्घाटन देखील करण्यात आले होते. मात्र आता याच उद्यानात बसणं म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा दिल्या सारखी परिस्थिती झाली आहे. 


काय आत्ताची परिस्थिती... 


केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या तलावात कमळ फुललेच नाहीच, खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सूर्यकुंडात शेवाळ पाहायला मिळतायत, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या लॉन्सवर योगा तर सोडा पाच मिनिटे बसणेही अशक्य आहे. तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सरोवरात कमळ फुलले असले तरीही येथे दुर्गंधीमुळे पाच मिनिटे थांबणे अवघड आहे. 


या नेत्यांच्याही देखील नावं...


विशेष म्हणजे खाम नदीवर उभारण्यात आलेल्या उद्यानात स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील नावं दिली गेली असून, त्यांची देखील अवस्था वाईट आहे. कारण आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांच्या नावाने उभारलेल्या ओपन जिमची अवस्था एवढी वाईट आहे की, तिथे एकट्याने जाणंही शक्य नाही. कारण याठिकाणी सापांची भीती आहे. तर आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्या नावाने सतीश नाना-नानी पार्क आहे. मात्र तिथे देखील झुडपे वाढल्यामुळे बसणं सुद्धा  मुश्कील झाले आहे. तसेच पुढे गेले की, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावाने अंबादास फुलपाखरू उद्यान होते, मात्र ती पाटी आता दिसेनाशी झाली आहे. 


लाखो रुपये खर्च... 


स्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबादच्या छावणी परिषद, वोरक कंपनी, इको सत्त्व आणि नागरिकांच्या सहभागातून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला होता. यावेळी नदीच्या काठावर नागरिकांनी साठी पार्क उभारण्यात आला होता. तर प्रजासत्ताक दिनी उद्घाटन केलं त्यावेळी खाम नदीतील हे उद्यान अतिशय सुंदर आणि चकाचक होतं. विशेष म्हणजे यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र आता याच उद्यानाची अवस्था एखाद्या जंगलाप्रमाणे झाली आहे. 


लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? 


औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. उद्यानाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे म्हणून या इको पार्कमधील छोट्या भागांना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची नावे देण्यात आली होती. या भागातील उद्यानांना नाव देताना कुठल्याही पुढाऱ्यांनी विरोध केला नव्हता आणि ही नावं पाहून त्यांची चेहरे टवटवीत झाली होती. त्यामुळे किमान आता तरी या उद्यानाकडे हे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.