Solar Eclipse 2022: कालपासून आकाशात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत असतानाच, आज आकाशात सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार आहे. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे.  औरंगाबाद येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल, अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. 


या विषयी बोलताना श्रीनिवास औंधकर म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून पहायला मिळणार आहे. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात सायंकाळी सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. 


असा असणार सूर्यग्रहण...


औरंगाबाद येथून सायंकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल. ग्रहण मध्य सायंकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. पश्चिम आकाशात सूर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6 वाजून 09 मिनिटांनी सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसणार आहे. 


साध्या डोळ्यांनी पाहिल्यास दृष्टीस इजा


तर मराठवाड्यात ग्रहण ग्रसण्याची टक्केवारी ही सर्वात कमी उस्मानाबाद येथे 33 टक्के तर, सर्वात जास्त जालना येथे 37 टक्के असणार आहे. सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहिल्यास दृष्टीस इजा होते. त्यामुळे सूर्यग्रहण हे ग्रहण चष्म्यातूनच पाहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पाहावे असेही श्रीनिवास औंधकर म्हणाले. तर या सूर्यग्रहणानंतर 14 दिवसांनी मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार असल्याचं देखील औंधकर म्हणाले.


Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी