Suryagrahan 2022 : यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे आज (25 ऑक्टोबर) सूर्यग्रहण (Solar Eclipse) होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. 2022 मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. भारतात सूर्यग्रहण सायंकाळी 4:29 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. त्यामुळे भारतातील सुतक कालावधी 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजल्यानंतर वैध असेल. समाजातील प्रचलित समजुती बाजूला ठेवून प्रत्येकाने हा आनंद घ्यावा पण त्याबरोबर थोडी काळजी देखील घ्या.
विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे
ग्रहणांबद्दल समाजात अजूनही पारंपारिक समजुती आहेत. परंतु खगोल शास्त्रात त्यांना कसलाही आधार नाही. त्यामुळे, डोळ्यांची योग्य ती काळजी घेऊन सूर्य ग्रहण पाहिल्यास त्यापासून कोणासही कधीही, कसलाही अपाय होत नाही. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांनी डोळ्यांतील कॉर्निया या नाजूक पटलास इजा होऊन दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे.
'सोलार एक्लिप्स गॉगल' सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित
सूर्यापासून येणारी किरणे आपल्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा करू शकतात. दृष्टिपटलामधील पेशींना इजा होऊ शकते. त्यामुळे दुर्बीण किंवा एक्सरेद्वारे सूर्याकडे बघणेही घातक आहे. बाजारात मिळणारे 'सोलार एक्लिप्स गॉगल' सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित आहे. परंतु गॉगल डोळ्याला लावून मगच सूर्याकडे पाहावे आणि सूर्याकडून नजर हटवल्यावर मगच गॉगल डोळ्यावरून बाजूला करावा. बाजारात सध्या कमी दर्जाचे, स्वस्त गॉगल आले आहेत. परंतु अशा कमी दर्जाच्या गॉगलमुळे तुमच्या डोळ्यांना इजा पोहचू शकते. टेलिस्कोपद्वारे ग्रहण प्रत्यक्ष बघायचे असेल किंवा कॅमेराने फोटो काढायचे असतील, तर बाजारात मिळणारे सोलार फिल्टर टेलिस्कोप किंवा कॅमेराच्या पुढे लावूनच निरीक्षण करावे.
असे पाहता येईल घरच्या घरी सूर्यग्रहण
एक बाय एक फूट आकाराचा पुठ्ठा घेऊन त्याला मध्यभागी एक इंच त्रिजेचे वर्तुळाकार छिद्र पाडावे. भिंत किंवा पडदा आणि दुसऱ्या बाजूला एक छोटा सपाट आरसा यामध्ये छिद्र पाडलेला पुठ्ठा धरावा. सूर्यग्रहण काळामध्ये सूर्याचे प्रतिबिंब सपाट आरशात पडून ते परावर्तित होऊन , पुठ्ठ्याच्या छिद्रातून भिंतीवर किंवा पडद्यावर पडेल, अशी योजना करावी. सूर्यग्रहण लागल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत आपल्याला सूर्याकडे न पाहताही, सूर्यग्रहणाचे अवलोकन करता येईल. त्याचा आनंद घेता येईल.