Aurangabad News: भारतात फेब्रुवारी 2023  मध्ये जी-20 (G-20) देशांची परिषद होणार आहे. दरम्यान या काळात परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचे प्रतिनिधी मंडळ औरंगाबाद शहरालाही भेट देणार आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका कामाला लागली असून, शहरातील विकास कामांना गती देण्यात आली आहे. तर चिकलठाणा विमानतळापासून ते हॉटेल ताजपर्यंतचा रस्ता सुशोभित आणि गुळगुळीत करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहे. 


महापालिका आयुक्त चौधरी यांनी मंगळवारी हॉटेल ताजपासून ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी या मार्गावरील वाहतूक बेट सौंदर्यीकरण करणे, रस्ता दुभाजक सौंदर्यीकरण करणे, दुभाजक आणि रोडच्या कडेला माती उचलून घेणे, रस्त्यालगत पडलेला मलबा उचलणे तसेच या मार्गावरील ग्रीन बेल्ट विकसित करणे, फुटपाथ विकसित करणे व त्यांचे सौंदर्यकरण करणे तसेच सिडको उड्डाण पुलावर रोषणाई करणे, पिरामिड स्क्वेअरची रंगरंगोटी करणे, दिल्ली गेटची साफसफाई करणे आणि हॉटेल ताज ते विमानतळापर्यंत या मार्गावरील अतिक्रमण काढून घेणे अशा सूचना प्रशासक डॉ. चौधरी यांनी यावेळी केल्या.   


यावेळी आयुक्तांच्या पाहणीची सुरुवात ताज हॉटेलपासून झाली. हर्सल टी पॉइंटमार्गे जळगाव हायवे, सिडको बस स्टॅन्ड ते विमानतळ आणि विमानतळापासून हॉटेल रामा इंटरनॅशनल समोर अशी पाहणी आयुक्तांकडून करण्यात आली. पाहणी दौऱ्यात शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, एम. बी. काझी, डी. के. पंडित, उपायुक्त सोमनाथ जाधव, उपायुक्त राहुल सूर्यवंशी, वॉर्ड अभियंता फारुख खान, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी शाहेद शेख आदींची उपस्थिती होती.


प्रशासन लागलं कामाला...


जी-20 परिषदेचे प्रतिनिधी औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार असल्याने महानगरपालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासन कामाला लागलं आहे. शहरातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच शहरात लावण्यात आलेली छोटे-मोठी होर्डींग काढण्यासाठी महानगरपालिकेनी वेगवेगळ्या पथकाची नियुक्ती करून कारवाई सुरु केली आहे. तसेच जी-20 परिषदेचे प्रतिनिधी जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ता तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी मनपा आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून या सर्व कामांकडे लक्ष देत आहे. 


दरवाज्यांवर रोषणाई...


बावन्न दरवाज्यांचं शहर अशी औरंगाबाद शहराची ओळख आले. दरम्यान याच ऐतिहासिक दरवाज्यांची रोषणाई शहराच्या सौंदर्यातच अधिक भर घालत आहे. कारण औरंगाबादच्या इतिहासात प्रथमच शहरातील ऐतिहासिक दरवाज्यांचं रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी हेरिटेज संवर्धन प्रकल्पांतर्गत शहरातील हेरिटेज वास्तूंवर रोषणाई करण्यात येत आहे.