Aurangabad News: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) 7 नोव्हेंबरपासून औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. मात्र त्यापूर्वीच औरंगाबादच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मानापमाननाट्य पाहायला मिळत आहे. कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी (Kishanchand Tanwani) यांचा अपमान केला असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. मनपाच्या बैठकीत तनवाणी यांना डावलून दानवेंनी आयुक्तांची भेट बैठक घेतल्याचा आरोप होत असून, तनवाणी यांना शेवटच्या दहा मिनिटे आधी नरोप देण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे तनवाणी यांनी पाठ फिरवली. 


गुरुवारी औरंगाबादच्या महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) आयुक्त यांच्यासोबत दानवे यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी पक्षातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. पण याचवेळी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना दानवे यांनी बैठकीच्या दहा मिनटापूर्वी पीएमार्फत निरोप दिला गेला. त्यामुळे तनवाणी संतापले आणि ते बैठकीकडे फिरकलेच नाहीत. तर अंबादास दानवे वारंवार तनवाणी यांचा ठरवून अपमान करत असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात रंगलेल्या मानापमाननाट्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 


आधीच बंडखोरी त्यात मानापमाननाट्य...


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांमध्ये सर्वाधिक आमदार औरंगाबादचे होते. त्यामुळे औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का समाजाला जातो. एकाचवेळी पाच आमदार गेल्याने औरंगाबादमध्ये ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली असल्याचे चित्र आहे. मात्र अशातच आता  मानापमाननाट्य समोर आल्याने ठाकरे गटाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


आदित्य ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर... 


आदित्य ठाकरे हे 7 नोव्हेंबरपासून औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे. त्यामुळे आदित्य ठकारे यांची सभा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी यासाठी बैठका घेण्यात येत आहे. खुद्द विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यासाठी तयारी करत आहे. तर या सभेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पदाधिकारी आपापल्या भागातून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करतांना पाहायला मिळत आहे. 


आदित्य ठाकरेंना औरंगाबादेतील सभास्थळ बदलण्याचा पोलिसांचा सल्ला; परवानगीबाबत आज निर्णय होणार