MIM First Convention: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचा (MIM) पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन मुंबईत (Mumbai) करण्यात आले आहे. 25 आणि 26 फेब्रुवारीला हे अधिवेशन होणार आहे. तर हे अधिवेशन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार असून, राष्ट्रीय कार्यकारिणीसह सर्व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएमकडून आयोजित करण्यात आलेलं हे अधिवेशन महत्वाचे समजले जात आहे. 


मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात एमआयएम पक्ष संगठन, पक्षाची विचारसरणी व ध्येय धोरणानुसार काम करत असतांना काही बदल करणे अपेक्षित आहे. राज्यात पक्षाचे स्थान, आगामी काळात केले जाणारे बदल या दृष्टीने नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच दोन दिवसाच्या अधिवेशनात प्रमुख पदाधिकार्‍यांनी व्यक्त केलेले मत व दिलेल्या सूचनांवरसुद्धा चर्चा होणार आहे.


पहिला दिवस...


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (25 फेब्रुवारी) शनिवार रोजी एमआयएम पक्षाची संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार, आमदार आणि विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार आहे. प्रत्येक राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांचे मत मांडण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे आयोजन हॉटेल रमदा नवी मुंबई येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान करण्यात आले आहे.


दुसरा दिवस...


अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी (26 फेब्रुवारी) रविवार रोजी एमआयएम पक्षाचे देशभरातील विविध राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच महिला विंग, युथ विंग, स्टुडंट विंगचे जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्यासह पक्षाच्या वतीने निवडून आलेले सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतचे सदस्य सहभागी होणार आहे. वर्ष 2021-23 मध्ये सर्व राज्यातील विविध मतदारसंघात आमदारकीसाठी निवडणूक लढविणारे उमेदवारसुद्धा सहभागी होणार आहेत. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीचे आयोजन ओमेगा बॅनक्युटस्, लेकमी कंपाउंड अप्परच्या पाठीमागे चेंबूर मुंबई येथे करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी उपस्थित राहणारे पक्षाचे सर्व पदाधिकार्‍यांना खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी मागदर्शन करतील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी हे सकाळी 09 ते 09.30 दरम्यान मिडियासोबत संवाद साधणार आहेत.  


राष्ट्रीय अधिवेशन दरम्यान दोन जनसभेचे आयोजन


एमआयएम पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशादरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबईत दोन जनसभाचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. पहिली सभा 25 फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता एम.एम वॅली रोड, मुंब्रा प्रभाग समिती समोर, मुंब्रा येथे आयोजित केली आहे. तर दुसरी सभा 26 फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी सात वाजता वंदे मातरम ग्राउंड, गॅलक्सी हॉटेलच्या जवळ, म्हाडा मालवणी, मलाड पश्चिम मुंबई येथे आयोजित केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Politics : पक्ष आणि चिन्हावर कोर्टात काय झालं? जाणून घ्या A टू Z माहिती