Aurangabad News: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच 'शिव संवाद' यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. तर आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने केला आहे. दरम्यान या घटनेनंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी थेट पोलिस महासंचालकांना पत्र लिहून, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये कसूर झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची गांभीर्यानं नोंद घेण्याची विनंतीही दानवे यांनी केली आहे. 


अंबादास दानवे यांनी पोलिस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "आदित्य ठाकरे यांचा "शिव संवाद" यात्रेचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. मंगळवारी 7 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे ग्राम सचिवालय समोरील मैदानात जाहीर सभा सुरू असताना तेथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तर सभा संपवून तेथून निघताना आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चालून आला. सदर प्रकरणी सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, असे पोलिस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. 


काय आहे प्रकरण! 


आदित्य ठाकरे मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. दरम्यान वैजापूर येथील महालगावमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमात काही अज्ञात लोकांनी गोंधळ घातला. तसेच आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर येऊन त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं समजतेय. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाली. त्यामुळे काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आलेय. यामुळे काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. 


चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप... 


दरम्यान या सर्व घटनेवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गंभीर आरोप केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात गोंधळ सुरु असताना पोलिसांनी काहीच सहकार्य केले नसल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. सोबतच झालेला सर्व प्रकार शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांनी घडवून आणला असल्याचं देखील खैरे म्हणाले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा संपल्यावर आमदार बोरणारे यांना आम्ही देखील उत्तर देणार असल्याचं खैरे म्हणाले. त्यामुळे आता शिंदे-ठाकरे गटातील वाद या घटनेने आणखीच विकोपाला गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.  


संबंधित बातमी: 


औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक