Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक घटना समोर आली असून, राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पाचव्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. विशेष म्हणजे आपल्या एका मित्रासोबत फोनवर बोलताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. युक्ती सुशील बुजाडे (रा. त्रिमूर्तीनगर, जि. चंद्रपूर, ह. मु. मुलींचे वसतिगृह, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्ती ही विधी विद्यापीठातील पाचव्या आणि अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. ती विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात राहत होती. तीन महिन्यांवर परीक्षा आल्याने त्यासाठी ती तयारी करत होती. मंगळवारी (17 जानेवारी) तिचे डोके दुखत असल्याने ती लेक्चरला गेली नव्हती, मात्र तिची रुममेट लेक्चरला गेली होती. दरम्यान तिच्या शेजारच्या खोलीत असलेल्या मुलीला दुपारच्या वेळी युक्ती मित्रासोबत बोलताना आवाज आला होता. विशेष म्हणजे बराच वेळ हा आवाज सुरु होता. पण काही वेळाने तो शांत झाला.
युक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली
लेक्चरला गेलेली युक्तीची रुममेट दुपारी तीन वाजता परत आली. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. तिने आवाज दिला, पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे युक्ती कदाचित झोपली असेल असे समजून ती खाली गेली. काही वेळानंतर तिने पुन्हा दरवाजा वाजवला. तेव्हाही युक्तीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे साडेतीन वाजता तिने अखेर वसतिगृहाच्या वॉर्डनला हा प्रकार सांगितला. त्यांनी दरवाजा जोरात वाजवला, पण तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, दरवाजा तोडला तेव्हा युक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
वसतिगृहाच्या वॉर्डन यांनी दरवाजा वाजूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर दरवाजा तोडला. त्यावेळी युक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर युक्तीला खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने तिच्या कुटुंबीयांना कळवले. तर याबाबत माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर युक्तीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अजून कोणतेही माहिती समोर आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या: