Vat Purnima 2022: महाराष्ट्रात उद्या वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून सात जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना करते. मात्र औरंगाबाद पत्नीपीडित पतींनी पिंपळाला फेऱ्या मारत हीच पत्नी पुढचे सात जन्म नको म्हणून पिंपळाला फेऱ्या मारत यमराजाकडे मनोकामना केली आहे. 


7 सेकंदही अशी बायको नको


औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीपीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्य़ा नव-यांना मदत करण्याचे काम करते. मात्र याचवेळी त्यांनी वटपोर्णिमेचा मुहूर्त साधत अनोखं आंदोलन केलं आहे. तसेच पुरुषांना त्रास देणा-या महिलांचा निषेध केला.  पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पत्नीपीडित पुरुषांनी केली. सोबतच पुढील 7 जन्मच काय 7 सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देत, पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांनी पूजन केले आहे. 


यावेळी पिंपळपौर्णिमा साजरी करताना या पत्नीपीडित पुरुषांनी नवऱ्याला छळणाऱ्या बायकांचं ऐकू नको त्या खोटं बोलत आहेत. या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मीतरी, अशी बायको देऊ नको, असं म्हणत पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या आणि यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे या पत्नीपीडित नवरोबांची पिंपळपौर्णिमाची मोठी चर्चा पाहायला मिळतेय. 


पत्नीपिडीत पुरुषांसाठी आश्रम....


आतापर्यंत आपण वृद्धाश्रम, अनाथ आश्रम पाहिले असतील. मात्र औरंगाबादच्या वाळूज भागात पत्नी पीडितांसाठीचा महाराष्ट्रातील पहिला आश्रम तयार करण्यात आले आहे. सहा पुरुषांनी एकत्र येत सुरवातीला हे आश्रम सुरु केले होते. मात्र हि संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कायदे महिलांच्या बाजूने उभे आहे आणि समाजाची सहानभूती सुद्धा महिलांना मिळते. त्यामुळे काही वेळा पुरुषांची चूक नसतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भरत फुले नावाच्या व्यक्तीने हा आश्रम सुरु केला आहे. तर दरवर्षी या आश्रमात पत्नीपीडित नवरोबांची पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते.