Aurangabad News: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली आज कन्नडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आपल्या विविध मागण्यासाठी संजना जाधव यांनी कन्नड शहरातील पिशोर नाका ते तहसील कार्यालयपर्यंत भव्य असा मोर्चा काढला होता. मात्र मोर्चा सुरु होताच याठिकाणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांची देखील एन्ट्री झाल्याने चर्चेचा विषय बनला होता. एवढचं नाही तर हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांच्या मोर्च्याचे स्वागत करत, जोरदार घोषणाबाजी देखील केली. मात्र जाधव यांच्याकडे दुर्लक्ष करत संजना जाधव यांची आपला मोर्चा कायम ठेवला.


कन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज कन्नडमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा, पी.एम. सन्मान निधीचा लाभ मिळावा, 2021-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान या मोर्च्यात मोठ्याप्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. 


मोर्च्याच्या ठिकाणी हर्षवर्धन जाधवांची एन्ट्री! 


संजना जाधव यांच्यासह रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र आज संजना जाधव यांचा मोर्चा निघताच मोर्च्याच्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव देखील त्या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळाले. हातात ज्यूसचा ग्लास घेऊन जाधव मोर्च्याच्या मार्गावरील एका ठिकाणी खुर्ची टाकून बसले होते. तर यावेळी त्यांनी मोर्च्याचे स्वागत करत घोषणाबाजी देखील केली. याबाबत त्यांना विचारले असता, 'मी शेतकरी आहे म्हणून, मी पण मोर्चाचे स्वागत करेन,' असे जाधव म्हणाले. 


मोर्च्यातील मागण्या! 



  • शेतकऱ्यांचे अतीवृष्टी अनुदानाचे पैसे त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.

  • शेतकऱ्यांचे विजबील सरसकट माफ करावे.

  • कन्नड तालुक्यातील उर्वरीत गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यात यावा.

  • पी. एम. किसान सन्मान निधीतील वंचीत शेतकऱ्यांचा समावेश करुन, त्यांना पी.एम. सन्मान निधीचा लाभ त्वरीत मिळावा.

  • कन्नड तालुक्यात 2021-22 मध्ये झालेल्या आतीवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.

  • कन्नड सोयगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे अतीशय दयनीय अवस्थेत आहे. तरी त्यांची सुधारणा तात्काळ करण्यात यावी.

  • महीला बचत गटांना व्यवसायाकरिता बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात यावा.

  • कापुस, ऊस, मका, सोयाबिन या पिकांना योग्य भाव मिळालाच पाहिजेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Exclusive: भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची मुलगी फडणवीस सरकारच्या विरोधात काढणार मोर्चा?