Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांच्या पुंडिकनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक लाखांचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला आहे. शिवाजी आनंदराव देशमुख (वय 38 वर्षे रा. गणेशनगर औरंगाबाद) आणि इरफान खान अफसर खान (वय 23 वर्षे रा. मोती कारजा औरंगाबाद) असे या आरोपींचे नावं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीतील गणेश नगर येथे राहणारा शिवाजी देशमुख हा पानटपरी तसेच दुकानादारांना प्रतिबंधीत गुटखा, सुगंधीत तंबाखु, पान मसाला विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एस.के. खटाणे यांनी सोबतच्या स्टॉफसह देशमुखचा शोध घेत त्याच्या घरावर छापा मारला. यावेळी पोलिसांना त्याच्या घरात मोठ्याप्रमाणावर गुटखा मिळुन आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुटखा कुठून आणला याबाबत चौकशी केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवाजी देशमुखची चौकशी केली असता, त्याने सदरचा माल नबाबपुरा येथील अजता टोबैको या दुकानातून खरेदी केला असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने तत्काळ अजता टोबैकोवर छापा मारला असता, दुकानातून इरफान खान याने गुटख्याचा मोठा साठा दुकानात लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी इरफानला ताब्यात घेत दुकानातील गुटखा देखील जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाई दोन्ही आरोपींकडून एकूण 1 लाख 3 हजार 626 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देऊन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई...
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे, सहाय्यक फौजदार रमेश सांगळे, पोलीस नाईक बाळाराम चौरे, गणेश डोईफोडे, संतोष पारधे, जालिंदर मान्टे, कल्याण निकम, राजेश यदमळ, इम्रान अत्तार, अजय कांबळे, दिपक जाधव यांनी केली.
गुटखा विक्री कधी थांबणार...
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सर्वत्र बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआमपणे विक्री होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात इतर राज्यातून गुटखा दाखल होत असतांना देखील पोलिसांना याबाबत महिती मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गावातील टपरीपासून तर शहरातील प्रत्येक किराणा दुकानात गुटखा सहजपणे उपलब्ध होतो. तर गुटखा कारवाईची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.