अहमदनगर : एकीकडे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजार मात्र आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. हिवरे बाजार गावचे कार्याध्यक्ष पोपट पावर यांनी केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे हिवरे बाजार गावाने कोरोनामुक्त होऊन आणखी एक आदर्श समोर ठेवला आहे.


हिवरे बाजार गावचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी 1992 पासून गावात केलेल्या विविध कामांमुळे आपल्या गावचे नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे. आता या गावाने कोरोनासारख्या महामारीवर मात करुन आणखी एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या सरासरी दररोज 4000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबधित होत आहे. मात्र हिवरे बाजार हे आता 15 मे रोजी कोरोनामुक्त होत आहे. मार्च महिन्यात या गावात पहिला रुग्ण कोरोनाबधित सापडला. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात गावची 52 वर गेली. मात्र पोपट पवार यांनी पुढाकार घेऊन योग्य नियोजन केले. त्यामुळे सध्या गावात केवळ एक रुग्ण कोरोनाबधित असून येत्या 15 रोजी संपूर्ण गाव कोरोनामुक्त होणार आहे. 


कोरोनाबधित रुग्ण सापडल्यानंतर पोपट पवारांनी गावात चार पथके तैनात केली. कोरोनाबाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले, बाधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन उपचार दिले आणि यामुळे या गावातील कोरोनाची चेन ब्रेक झाली. 




हिवरे बाजार गावात एक ते दीड महिन्यात 52 रुग्ण कोरोनाबधित आढळले. मात्र या गावात राबवलेल्या योग्य नियोजनामुळे गावात सध्या फक्त एक रुग्ण कोरोनाबधित असून 15 मे रोजी हे गाव कोरोनामुक्त होणार आहे. विशेष म्हणजे नियोजनबद्ध काम आणि योग्य उपचार दिल्याने 82 वर्षाच्या वृद्धापासून ते कोरोनाबधित असलेले संपूर्ण कुटुंब अगदी सुखरुप बरे होऊन घरी परतले आहेत. 


सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध तर काही ठिकाणी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र केवळ प्रशासनाला दोष न देता स्वतः काळजी घेतली तर कोरोनाला आळा बसेल असे आवाहन देखील पोपट पवारांनी केले आहे. 


गावात शिस्तीचे पालन, नियोजनबद्ध काम आणि योग्य उपचार दिले तर गावचे गाव कोरोनामुक्त होऊ शकते हे आदर्श गाव हिवरे बाजारने दाखवून दिले आहे. अशाप्रकारे काम प्रत्येक गावात केले तर कोरोनासारख्या महामारीवर मात करणे सोपे जाईल हे नक्की.