NIA Action On PFI : सिमीनंतर गेले काही दिवस तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. दहशतवादाशी संबंध असल्यानं केंद्र सरकारनं ही मोठी कारवाई केलीय, विशेष म्हणजे पीएफआयच्या 6 सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आलीय. तर पीएफआय संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर आता केंद्राने या संघटनेला आणखी एक दणका दिला आहे. पीएफआयशी संबंधित देशभरातील34 बँक खाते एनआयकडून गोठवण्यात आली आहे. त्यामुळे आता पीएफआचं आर्थिक कंबरडं मोडण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. 


केंद्रीय तपास यंत्रणानी गेल्या आठ दिवसांत दोनवेळा देशभरात पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. देशविरोधात कट रचल्याचा आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप पीएफआयवर आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकराने पीएफआयविरोधात मोठं पाऊल उचलत पीएफआयसह 6  सहयोगी संघटनांवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. त्यातच एनआयकडून पीएफआयशी संबंधित देशभरातील34 बँक खाते गोठवण्यात आले आहे. इडीच्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 


PFI खात्यात 120 कोटी जमा...


दोन आठवड्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशातील अनेक भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या परिसरावर छापे टाकले होते. या छाप्यानंतर ईडीने पीएफआयच्या चार महत्त्वाच्या सदस्यांना अटक केली. ज्यात पीएफआय नेता मोहम्मद शफीक पायथ यालाही ईडीने केरळमधील कोझिकोड येथून अटक केली होती. तर शफीक पायथला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांच्या खात्यांमध्ये गेल्या काही वर्षांत 120 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली होती. दरम्यान आता  पीएफआयशी संबंधित 34 बँक खाते गोठवण्यात आले आहे. 


असा होता पीएफआयचा मास्टर प्लॅन!



  • ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त आहे, तिथं नेटवर्क उभं करून मुस्लीम समाजाला एकत्र करणं.

  • मुस्लीम एससी, एसटी आणि ओबीसी यांच्यामध्ये आपण दुय्यम दर्जाचे आहोत ही भावना वाढीस लावणे.

  • मुस्लीम समाजाच्या मनात भावना निर्माण करणे की, त्यांची परिस्थिती पारतंत्र्यापेक्षा वाईट आहे.

  • संपत्तीच्या बाबतीत त्यांना असणारे विशेष अधिकार आता काढून घेण्यात आल्याची भावना मुस्लीम समाजात निर्माण करणे.

  • मुस्लिमांना सरकारी नोकरीतून दूर करत त्यांच्या उद्योग धंद्यांवर देखील आता गदा करण्यात आली असल्याची भावना निर्माण करणे.

  • हिंदुत्ववादी आणि आरएसएसच्या नेत्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर नजर ठेवणे.

  • हिंसेचा वापर करून आपली ताकद वाढवणे आणि बहुसंख्या जनतेला भीती खाली ठेवणे.

  • ज्या ठिकाणी संघटनेचं काम उत्तम सुरू आहे त्या ठिकाणी हत्यारे आणि बॉम्ब पोहोचवण्याचं काम करणे.

  • इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा आपला अजेंडा लपवण्यासाठी राष्ट्रीय ध्वज, संविधानाचा वापर करणे.