अकोला : अकोल्यात एका विद्यार्थ्याची त्याच्यासोबत राहणाऱ्या दुसऱ्या त्याच्या विद्यार्थी मित्रानेच हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे खासगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रतीक लवंगे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आरोपी आणि मृत दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. हे दोघेही अकोल्यातील शास्त्रीनगर भागात भाड्याने खोली घेऊन एकत्र राहत होते. ते दोघेही 'नीट' परीक्षेची तयारी करण्यासाठी अकोल्यात शिकवणी वर्गासाठी राहत होते. अकोला पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. हत्येची घटना 17 जूनच्या रात्री घडली होती. काल (20 जून) या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी आणि मृत तरुण दोघेही जीवलग मित्र
या प्रकरणातील आरोपी विद्यार्थी आणि मृतक प्रतीक लवंगे या बालपणापासून एकमेकांचे जीवलग मित्र होते. आधीपासून एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती. त्यामुळेच दहावीनंतर 'नीट' परीक्षेच्या अभ्यासासाठी दोघांनीही अकोल्यात प्रवेश घेतला. ते दोघेही एकाच शिकवणी वर्गात शिकत होते. अकोल्यातील शास्त्रीनगर भागात एका घरी त्यांनी भाड्याने खोली घेतली होती. दोघेही अतिशय घनिष्ठ मित्र असल्याने घरचेही अगदी निष्काळजी होते. मात्र, या घटनेने दोघांचेही कुटुंबीय पार हादरुन गेले आहेत.
हत्येच्या कारणाचं गूढ कायम
प्रतीक लवंगेच्या जीवलग मित्राने त्याची हत्या का केली असावी? याचा अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस तपास करत आहेत. 17 जून रोजी रात्री कुठल्या तरी कारणावरुन या दोघांचा आपसात वाद झाला. या वादातच प्रतीक लवंगे याची त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने घरमालकाला आपला मित्र बेशुद्ध झाल्याचे सांगितले. घरमालकाने तोपर्यंत पोलिसांनाही याची सूचना दिली होती. प्रतीकला दवाखान्यात भरती करताना त्याचा आरोपी मित्रही सोबत होता. दवाखान्यात डॉक्टरांनी प्रतीकला मृत घोषित केले. यावेळी पोलिसांना त्याच्या अंगावर काही संशयास्पद खुणा दिसल्याने त्यांचा संशय होताच. त्यांनी याप्रकरणी आरोपीवर पाळत ठेवत त्याची चौकशीही केली होती. काल याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला. त्यात प्रतीकचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. यावरुन काल पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, आपल्याच जीवलग मित्राची हत्या आरोपीने का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. अभ्यासातील एका मुद्द्यावरुन दोघांत वाद झाले अन् यातूनच वाद विकोपाला जाऊन ही हत्या घडली असावी, असा एक प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, आणखी तपासानंतर यातील खरं सत्य बाहेर येईल.
पालकांनी अधिक जागरुक असणं गरजेचं
या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सगळीकडेच 'कोचिंग क्लासेस'ची चलती आहे. अशावेळी मोठ्या शहरांतील शिकवणी वर्गात प्रवेश घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात राहतात. यावेळी मित्रांसोबत भाड्याने खोली घेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. आपले पाल्य बाहेर शिकत असताना पालकांनी आपल्या मुलांशी नियमित संवाद ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांचे मित्र, त्यांच्यातील वाद यावरही लक्ष ठेवल्यास अशा घटना टाळता येऊ शकतील.