जळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप, त्यात शाळा, कॉलेज सुरु झाल्याने विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. मात्र कॉलेजसाठीचा प्रवास जळगावातील एका विद्यार्थिनीच्या जीवावर उठला आहे. घरी परत येताना खचाखच भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तृप्ती चौधरी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.
जळगावच्या बोदवड तालुक्यातील शेलवड गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली. कॉलेज संपल्यावर घरी जात असलेल्या अकरावी शिकणाऱ्या तृप्ती चौधरीचा रिक्षातून पडून मृत्यू झाला. खचाखच भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन तृप्ती चौधरी खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुलांच्या आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
एसटी कर्मचारी संपावर असल्याने गेल्या काही महिन्यापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करुन आपली वेळ भागून घेत आहेत. मात्र यावेळी अनेक खासगी वाहनधारक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. आपल्या आसन संख्येच्या डबल प्रवाशांची वाहनातून वाहतूक करत आहेत. प्रवाशांनाही पर्याय नसल्याने ते अशा वाहनातून प्रवास करत आहेत. परंतु हाच प्रवास जीवावर बेतत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पायपीट
गावात, खेड्यापाड्यात एसटीचा मोठा आधार आहे. पण एसटीचा सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करुन शाळा, कॉलेजमध्ये पोहोचावं लागतं. दररोज 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी शाळा गाठत आहेत. एबीपी माझाने कालच (24 मार्च) डहाणूतल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा दाखवल्या आणि या व्यथा फक्त डहाणूतल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. एसटी सुरु असताना विद्यार्थ्यांकडे पास होता. मोफत एसटीचा प्रवास होता. मात्र, एसटी बंद असताना आता खासगी वाहनाने जायला सुद्धा पैसा घरातून दिले जात नाही कारण तशी घरच्यांची परिस्थिती पण नाही. मग मिळाले तर घरातून नाहीतर मित्रांकडून उसणे घेऊन काही विद्यार्थी रिक्षाने जातात, नाहीतर पायपीट आहेच. त्यामुळे या व्यथा ऐकून एसटी कर्मचाऱ्यांना पाझर फुटणार का? सरकार यावर काही करणार, की डोळे झाकून गप्प बसणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी आंदोलक आझाद मैदानावर बसले आहेत. एसटी संदर्भात सरकार बैठका घेत आहे पण यामध्ये कोणताही तोडगा निघत नाही. मात्र याचा फटका सर्वसामान्यांना होत आहे. एसटी बंदमुळे शाळेत रोज दूर जायचं कसे ? कशाला रोज पायपीट करायची ? म्हणत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सुद्धा सोडून दिले आहे. जर एसटी आणखी अशीच काही दिवस बंद राहिली तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि याला जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे.