Sanjay Raut On Pen Drive Case : सध्या महाराष्ट्रात पेन ड्राईव्हची खूप चर्चा सुरु आहे. पेन ड्राईव्ह प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी म्हटलं आहे की, त्यांच्या घरात रोज पेन ड्राईव्ह बाळंत होतात का बघावे लागेल. हा पेन ड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु, असं ते म्हणाले. रोज एक खोटं प्रकरण तयार करता कसे? रोज नवीन बाळंतपण कसं जमतं काय माहीत, असं राऊत म्हणाले.  महाराष्ट्रात हे नवीनच आहे रोज नवीन एक पेनड्राईव्ह बाळंतपण होत आहे, असं ते म्हणाले.


संजय राऊत म्हणाले की, माझ्या नागपूर दौऱ्याची पोटदुखी ही पेनड्राईव्हच्यामार्फत निघत आहे. नागपूर दौऱ्यानंतर पेन ड्राईव्ह बाळंत झाले आहेत. यापुढे देखील नागपूर दौरा चालूच राहील. पक्ष संघटना मजबूत करू, पक्षाचे आदेश पाळू, असं ते म्हणाले.


...त्यांना महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही 


संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची हात मिळवणी चालू आहे. त्यातून दिसून येत आहे की महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही आहे. खोट्या प्रकरणातून हे सरकार उध्वस्त करायचे आहे. आरोपपत्र परस्पर तयार करतात. आम्हाला आमच्यावर कोणते आरोप आहे माहीत नाही, असं ते म्हणाले. 


महाराष्ट्रामुळे जो तुमचा तळमळत आत्मा आहे तो शांत करा!


महाराष्ट्रामुळे जो तुमचा आत्मा तळमळत आहे तो शांत करा.  ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचे ती यादी तयार करा आणि सांगा मला या 25 लोकांना तुरुंगात टाकायचे आहे. आधी तुरुंगात टाका मग आमच्यावर आरोप करा काही हरकत नाही.  कुपद्धतीच्या घाणेरड्या पद्धतीच्या या कारवाया चालू आहेत. महाराष्ट्रात नीच आणि इतका हलकट पातळीचे राजकारण कधीही झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता.आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे का.? असा सवालही त्यांनी केला. 


इसाक बागवान यांच्यावरील आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पोलीस दलाचे खच्चीकरण करायचे. बागवान यांनी 26/11 हल्ल्यात जीवाची बाजी लावून इस्रायली मुलाला वाचवले आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या प्रशासनाचे खच्चीकरण करता, त्याप्रमाणे असे वाटते की दाऊदने यांना सुपारी दिली आहे की काय? या लोकांना पाकिस्तानने सुपारी दिली आहे की कायय़ अल कायद्याचा अजेंडा  हा होता का? असा सवाल त्यांनी केला.