Weather Forecast: नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. वातावरणात उत्साह असला राज्यात थंडीचा कडाका कमी झाल्याचं चित्र असलं तरी कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह राज्याच्या दिशेनं येत असल्यानं अनेक भागात सकाळी दाट धुक्याची चादर आणि हलका गारवा आहे. सरत्या वर्षाला यंदा अल्हाददायक निरोप दिल्यानंतर नव्या वर्षात तापमान कसं असणार? पावसाची शक्यता आहे की थंडीची चाहूल पुन्हा लागणार याविषयी हवामान विभागानं (IMD weather forecast) काय सांगितलंय पाहूया..
गेल्या आठवड्यापासून तापमानात चढउतार होताना दिसत आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता उत्तरेतील राज्यांमध्ये कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह आणि थंडीची लाट असल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार होत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असल्याने दक्षिणेत तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. (Maharashtra Weather Update)
नव्या वर्षात हवामान कसं राहणार?
भारतीय हवामान विभागानं नव्या वर्षात उत्तर भारतात थंडीची लाट आणि दाट धुकं राहणार असल्याचा इशारा दिलाय. 2 जानेवारीपर्यंत पंजाब हरियाणा, झारखंड, हिमाचल प्रदेशासह जम्मू काश्मीरमध्ये तापमान 3 ते 5 अंशांनी घटणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान, जम्मू काश्मीर खोऱ्यात 'चिल्लई कलान' असल्याचं सांगितल्यानंतर काश्मीरचं तापमान उणे 8.5 अंश सेल्सियसवर पोहोचल्याची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंड रात्रीची नोंद तिथे झाली. हवामान विभागाच्या मते मध्य भारतात किमान तापमानाचा पारा येत्या आठवड्यात घसरणार असून 2-4 अंशांनी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात काय स्थिती?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, राज्यभरात येत्या पाच दिवसात तापमानात मोठे बदल होणार नसले तरी येत्या 3-4 दिवसात किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे. कमाल तापमान येत्या 24 तासांत 2-3 अंशांनी वाढणार असून हवामान कोरडं राहणार आहे. विदर्भात येत्या पाच दिवसात फारसा बदल होणार नसल्याचंही हवामान विभागानं वर्तवलंय. येतया दोन दिवसात हळूहळू किमान तापमान घटेल असंही सांगण्यात आलंय.
पुण्यात वर्षाच्या शेवटी कसं होतं तापमान?
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला असून थंडी गायब झालीय. सरत्या वर्षाला निरोप देताना पुण्यात किमान तापमानाचा पारा 17 ते 20 अंशांवर स्थिरावल्याचं पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस होसाळीकरांनी सांगितलं.x माध्यमावर केलेल्या पोस्टवरून मगरपट्टा भागात 20.4 एवढं सर्वाधिक किमान तापमान नोंदवलं गेलं. तर हवेली, तळेगाव भागात 13-14 अंशांवर किमान तापमानाचा पारा स्थरावला होता.