Eknath Shinde Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून गुरुवारी (30 जून 2022) शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय, राज ठाकरे, एकनाथ खडसे यांच्यासह सर्वच नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
गुरुवारी राजभवनमध्ये शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वसामान्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत शिंदे-फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
काय म्हणाले मोदी?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.. तुम्ही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आहात. तुमचा अनुभव महाराष्ट्र सरकारसाठी मोठा ठेवा आहे. मला विश्वास आहे की, तुम्ही महाराष्ट्राची प्रगती आणखी ताकदीने कराल, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन! तळागाळातील नेता, तो आपल्यासोबत समृद्ध राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय अनुभव घेऊन येतो.महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी तुम्ही एकत्र काम कराल अशी आपेक्षा आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नितीन गडकरी यांच्याकडून शुभेच्छा -
देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या नव्याने समोर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं अभिनंदर केलं आहे. त्यांनी अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत अभिनंदन केलं असून 'पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हा दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो,' असं ते म्हणाले आहेत.
नारायण राणे यांचे ट्वीट -
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अराजकतेला लगाम बसेल व राज्य पुन्हा प्रगतिपथावर अग्रेसर होईल ही खात्री आहे, असे ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेय.
राज ठाकरे काय म्हणाले?
आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा . आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका... पुन्हहा एकदा आपले अभिनंदन!
अजित पवारांकडूनही शुभेच्छा!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो