मुंबई: IPS अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची CISF च्या महासंचालक पदी निवड झाल्याने राज्याचे महासंचालक पद रिक्त होतं. त्यामुळे त्या पदाचा अतिरिक्त कारभार 1987 च्या बॅचचे IPS अधिकारी हेमंत नगराळे यांच्यावर सोपावण्यात आली आहे. हेमंत नगराळे आता लीगल आणि टेक्निकल विभागाचे पोलीस महासंचालक आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून हेमंत नगराळे यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी नागपूरात आपलं माध्यमिक शिक्षण घेतलं आणि तिथेच मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी मुंबईतून फायनान्स आणि मॅनेजमेंटचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. 1987 साली त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली.
सुबोध जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवर जाण्याने पोलीस दलाच्या मनोधैर्यावर काय परिणाम होतील?
नक्षलवादाविरोधात कारवाई
IPS झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग ही नक्षल प्रभावित चंद्रपूरात झाली. त्या ठिकाणी ASP म्हणून काम करताना त्यांनी उल्लेखनिय काम केलं. त्यानंतर 1992 ते 1994 सालच्या दरम्यान त्यांनी सोलापूरचे DCP म्हणून कारभार सांभाळला. त्यादरम्यान त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणली.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी दाभोळ पॉवर कार्पोरेशन संबंधित जमीन अधिग्रहण प्रकरण अत्यंत कौशल्याने हाताळले. रत्नागिरीत त्यांनी 1994 ते 1996 या काळात काम केलं. सन 1996 ते 1998 या दरम्यान CID क्राईमचे एसपी म्हणून काम करताना त्यांनी MPSC च्या घोटाळ्याचा तपास तडीस नेला. या काळात हेमंत नगराळे यांनी अनेक प्रकरणे उघडकीस आणले आणि पीडितांना न्याय दिला.
केंद्रातही मोठी जबाबदारी
हेमंत नगराळे यानी 1998 ते 2002 या काळात डेप्यूटेशनच्या माध्यमातून CBI मध्ये काम केलं. सुरुवातीला मुंबई CBI मध्ये काम केल्यानंतर त्यांनी दिल्लीत CBI च्या उपमहासंचालक पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलली. त्या दरम्यान 130 कोटी रुपयांचा केतन पारेख घोटाळा, 1800 कोटी रुपयांचा माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, 400 कोटी रुपयांचा हर्षद मेहता घोटाळा या प्रकरणांचा त्यांनी तपास केला. तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास करताना हेमंत नगराळे यांच्या रिसर्च कामाची मोठी मदत झाली.
सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलीस महासंचालक प्रतिनियुक्तीवर : देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर सारखा ग्रामीण भाग ते मुंबईसारखे महानगर या ग्रामीण आणि शहरी भागात आपल्या पोस्टिंगच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचं कौशल्य हेमंत नगराळे यांनी दाखवलं.
26/11 च्या हल्ल्यात RDX ने भरलेली बॅग घेऊन पळाले
सन 2008 साली हेमंत नगराळे यांना स्पेशल आयजी करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या व्हिजिलन्स विभागाचे डायरेक्टर हा पदभारही देण्यात आला होता. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात त्यांनी केलेल्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं. त्यावेळी हेमंत नगराळे यांनी अनेकांना हॉस्पिटलमध्ये पोहचवलं, अनेकांचा जीव वाचवला. या हल्ल्याच्या दरम्यान हेमंत नगराळे यांची नजर एका RDX ने भरलेल्या बॅगेवर गेली. हेमंत नगराळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ती बॅग उचलली आणि ते पळाले. एका खुल्या मैदानात पोहचल्यानंतर त्यांनी बॅग त्या ठिकाणी ठेवली. बॉम्ब स्कॉडच्या मदतीने नंतर ते RDX निकामी करण्यात आलं. अशा पध्दतीने हेमंत नगराळे यांनी शेकडो लोकांचा जीव त्यांनी वाचवला.
मोठी बातमी... पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्र्यांची घोषणा, सरकार शुद्धीपत्रक काढणार
पोलीस महासंचालक कार्यालयाच्या प्रशासन विभागाचे विशेष महासंचालक म्हणून काम करताना हेमंत नगराळे यांनी पोलिसांसाठी आरोग्य योजना सुरु केली. मुंबईच्या सह आयुक्तपदी काम करताना त्यांनी पोलिसांनी मिळणाऱ्या घरांच्या वितरणाच्या प्रक्रियेत सुधारणा आणली. सन 2014 साली काही मर्यादित काळासाठी त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांनी 2016 ते 2018 या काळात काम केलं.
हेमंत नगराळे यांना त्यांच्या कामासाठी राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच त्यांना विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा या पदकानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
फिटनेस आणि खेळाचे शौकीन
वरिष्ठ IPS हेमंत नगराळे हे गोल्फ आणि टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. सर्व खेळांत रुची असणारे हेमंत नगराळे हे आपल्या फिटनेसबद्दल सजग आहेत. जुडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवणाऱ्या हेमंत नगराळे यांनी ऑल इंडिया पोलीस गेम मध्येही पदक जिंकले आहे.
कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं समन्स, कारण...