सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यातलं अजून तरी काहीच मिळालं नाही. शेवटी देशाच्या पंतप्रधान यांनी जाहीर केलेलं ते पॅकेज आहे. त्यामुळे आम्हाला नरेंद्र मोदींकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. आजही केंद्र सरकारकडून आम्हाला फूल ना फुलाची पाकळी येईल असं वाटत होतं. पण अजून काही आलेलं नाही, ही मदत कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहोत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. सांगलीतील विटा नगरपालिकेला जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.
केंद्राकडून जीएसटीची रक्कम येण्यास उशीर
जयंत पाटील म्हणाले की, "केंद्र सरकारकडून जीएसटीची रक्कम येण्यास उशीर होत आहे. बरीच रक्कम प्रलंबित आहेत. त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की "फडणवीस यांनी जगाचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय. परदेशात लॉकडाऊन आणि राबवलेली धोरणे याचं त्यांनी वारेमाप कौतुक केलं आहे. पण त्यांनी त्यात भारताचा उल्लेख केलेला नाही. भारताचा उल्लेख न केल्यामुळे मला थोडी शंका आली. त्यांनाही असं वाटत असेल की परदेशात जशी धोरणं राबवली तशी भारतात राबवली गेली नाहीत, असंच त्यांना सूचित करायचं असेल."
माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला
"पंढरपूर इथल्या जाहीर सभेत गर्दीतील अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. त्यावर मी इतकेच म्हणालो की तुमच्याकडे बघून जगात कोरोना नाही असंच वाटतं. मात्र असं करु नका. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. मंत्रिमंडळत बैठकीत लॉकडाऊन करायचे, कडक निर्बंध घालायचे याबाबत निर्णय होणार आहे, असं मी म्हटलं होतं. परंतु मीडियामध्ये दिवसभर पहिल्या दोन वाक्यानाच जास्त प्रसिद्धी दिली. मी नंतर जे बोललो ते दाखवलेच नाही. असा माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उपक्रम झालेला आहे," असा शब्दात त्यांनी माध्यमांवरही तोंडसुख घेतलं.