Maharashtra Politics Crisis : अजित पवारांची (Ajit Pawar) सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने शिंदे गटात (Shinde Group) मोठी नाराजी असल्याचे समोर येत आहे. दरम्यान मंत्रीपदावरून शिंदे गटात यावरून दोन गट निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. तर मंगळवारी याच मुद्यावरून शिंदे गटाचे दोन आमदारांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली असल्याचे वृत्त 'लोकसत्ता'ने दिले आहे. विशेष म्हणजे, दोन आमदारांमध्ये बाचाबाची सुरु असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नागपूरचा दौरा सोडून मुंबईत परतल्याचे देखील दावा करण्यात आला आहे.
नेमकं काय घडले?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. यावेळी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेकांना संधी मिळाली. पण अनेक इच्छुकांना दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटातील इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. त्यामुळे शिंदे गटात आता दोन गट निर्माण झाले आहेत. तर मंत्री असलेल्या लोकांचे मंत्रीपद काढून आता ते आम्हाला देण्यात यावे अशी मागणी इच्छुक आमदारांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, अशाच एका बैठकीत दोन आमदारांत मंगळवारी सायंकाळी बाचाबाची आणि झटापट झाली. आमदारांमधील भांडणाची माहिती मिळताच नागपूर दौरा अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परत आले. तसेच, शिंदे यांच्या उपस्थितीत 'वर्षा' बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी?
लवकरच मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार असल्याची अपेक्षा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवारांच्या एन्ट्रीने धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. तर गरज नसतांना राष्ट्रवादीला सोबत का घेण्यात आले असा प्रश्न पडला असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहे. तसेच माझ्यासह अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहे. त्यामुळे आम्हाला संधी कधी मिळणार? आम्ही देखील बंड केला होता, आम्ही फक्त पालख्या वाहत राहायचे का? असा प्रश्न नाराज आमदारांकडून बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :