Mararashtra NCP Crisis: 2024 ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी भाजपनं कंबर कसली असून अनेक राज्यांत विरोधकांना थोपवण्यासाठी आतापासूनच डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या एका गटानं मोदींना रोखण्यासाठी एकजुट केली आहे. 2024 च्या दृष्टीनं सर्वात मोठा डाव भाजपनं महाराष्ट्रात टाकल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेलं बंड हेदेखील भाजपचाच (BJP) एक कट असल्याचं बोललं जात आहे. अशातच अजित पवारांना सोबत घेणं हे 2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरेल? हे जाणून घेऊयात...  


अजित पवार बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटीलही अजित पवारांसोबत अजित दादांसोबत गेले. एवढंच नाहीतर कोणाच्याही ध्यानी मनी नसताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यांच्यासोबत इतर 8 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सर्वांनी केंद्रीय यंत्रणांच्या भितीपोटी भाजपची साथ दिल्याचं बोललं जात आहे. पण केवळ अजित पवारांनाच भाजपच्या साथीची गरज नाही, तर भाजपलाही 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या साथीची गरज आहे.  


अनेक राज्यांत भाजप कमकुवत 


भाजपची लाट देशातील काही राज्यांतून ओसरताना दिसत आहे. यावेळी बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं. ही तिनही तिच राज्य आहेत, जिथे 2019 च्या निवडणुकीत भाजपनं एकतर्फी विजय मिळवला होता. 2019 मध्ये भाजप, एलजेपी आणि जेडीयूनं बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. परंतु, आता जेडीयूननं भाजपची साथ सोडली आणि भाजपनं बिहारमधील सत्ता गमावली. कर्नाटकात 28 पैकी 25 जागा भाजपनं जिंकल्या, तर एक जागा त्यांच्या समर्थक उमेदवारांच्या वाट्याला गेली, परंतु कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला.


2024 लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल 


महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेनं राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. राज्यात दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा जिंकता आल्या. एक जागा ओवेसींच्या एआयएमआयएमच्या खात्यात गेली. 


वर दिलेले आकडे दाखवतात. विशेषत: शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली असून एक गट भाजपसोबत आहे, मात्र जनता कोणासोबत आहे, याची पहिली कसोटी लोकसभा निवडणुकीतच होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपनं पाय रोवले आहेत. ईशान्य, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाय रोवणं मात्र काहीसं कठीण असणार आहे. तर दक्षिण भारतातही विजयासाठी भाजपला पराकाष्ठा करावी लागणार आहे. 


सर्वेक्षणानं वाढवलं भाजपचं टेन्शन 


भाजपला आपल्या जुन्या मतदारसंघांमध्ये पाय रोवणं अत्यंत गरजेचं आहे. जागांच्या बाबतीत महाराष्ट्र यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी जानेवारीमध्ये इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 34 जागांवर विजय मिळू शकतं, असा निष्कर्ष आला आहे. म्हणजेच, भाजप-शिवसेनेला (शिंदे गट) 14 जागांवर विजय मिळू शकतो. निष्कर्षात आलेल्या सर्वेक्षणानंतर भाजपनं तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. त्यासाठीच अजित पवारांना भाजपनं आपल्यात सामील करुन घेतल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीचा कणा म्हटले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे दिग्गजही बंडखोरी करुन भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. अशा स्थितीत 2024 पूर्वी हे भाजपचं मोठं यश मानलं जाऊ शकतं. मात्र कोणी कितीही बंड केले आणि कोणासोबतही जाऊन मिळाले , तरी जनता कोणाच्या पाठीशी आहे, हे तर येणारा काळच सांगेल, हे मात्र नक्की.