Maharashtra NCP Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाची (Maharashtra Politics) समीकरणंच बदलून गेली. अजित पवारांच्या शपथविधीनंतर केवळ विरोधकांमध्येच नाही, तर सत्ताधाऱ्यांसमोरही अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, मंत्रीपदं आणि खातेवाटप. शपथविधीला आठवडा उलटून गेला तरी, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खातेवाटप अद्याप प्रलंबित आहे. अशातच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, शिंदे-फडणवीस-पवार सत्तेचं नवं समीकरणं जुळवणार असून खातेवाटपासाठी भाजपच्या चार ते पाच मंत्र्यांना मंत्रीपदाचा त्याग करत राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र भाजपकडून या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या आहेत. भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी तशी  माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 


शिंदे फडणवीस आणि पवार सरकारनं मंत्रीपदं आणि खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सत्तेचं नवं समीकरण जुळवल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. त्यासाठी भाजपमधील चार ते पाच मंत्री राजीनामा देणार असल्याचंही बोललं जात आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी त्याग करून उपमुख्यमंत्री पद घेतलं. त्याच्यापाठोपाठ आता भाजपमधील काही मंत्रीही राजीनामा देतील आणि त्यानंतरच नवनिर्माचित मंत्र्यांचा खातेवाटप होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. खातेवाटपापूर्वी भाजपच्या मंत्र्यांचे राजिनामे घेणार असल्याचं वृत्त भाजपच्या उच्चपदस्थ सुत्रांकडून फेटाळण्यात आलं आहे.  


मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपच्या मंत्र्यांचे राजीनामे घेणार? 


राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत की, नवनिर्वाचित मंत्रीपदं दिल्यानंतर त्यांचा खातेवाटपासाठी काही मोठे फेरबदल केले जातील. त्यामध्ये आताचे जे मोठे मंत्री आहेत, त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं जाईल आणि त्यानंतर त्यांचं खातं नव्या मंत्र्यांना दिलं जाईल. यामध्ये भाजपच्या काही मंत्र्यांकडून राजीनामा घेतल्याचं बोललं जात होतं. काही मंत्र्यांची नावंही समोर आलं होतं. पण भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कोणत्याही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नाहीत. सध्या जे मंत्री आहेत, ते मंत्री राहतीलच पण खातेवाटपासाठी आता ज्या मंत्र्यांकडे जास्तीची खाती आहेत, त्यापैकी काही खाती नव्या मंत्र्यांकडे सोपवली जातील. पण राजीनामा कोणाचाच घेतला जाणार नाही. 


पाहा व्हिडीओ : BJP MLA Resignation : भाजपच्या कोणत्याही मंत्र्यांचे राजीनामे घेणार नाही : उच्चपदस्थ सूत्र



पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार? 


अजित पवारांसह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यानंतर प्रश्न उभा राहिला खातेवाटपाचा. आठवडा उलटल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांचं खातेवाटप झालेलं नाही. तसेच, शिंदे गटातील इतर काही आमदारही अद्याप मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रीपदाचे दावे केले होते. पण अजित पवारांच्या शपथविधीनंतर आता त्यातही वाटेकरी आल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातही मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करत मार्ग काढला असल्याच्या चर्चा आहेत. अशातच सर्व गोष्टींमधून मार्ग काढत अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे. पुढील 48 तासांत नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या एक ते दोन दिवसांत आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. त्यानंतरच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या मंत्र्यांचं खातेवाटप केलं जाईल, असं बोललं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार? शपथविधीला आठवडा उलटला तरी राष्ट्रवादीचे मंत्री खात्याशिवाय