Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) वरच्या फळीतील नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपच्या (BJP) साथीनं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय नेतेमंडळींनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. पण न भूतो, न भविष्यती अशा शपथविधीसोहळ्यानंतर मात्र अजित पवारांनी उचललेल्या पावलांबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच राज्यातील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी भाजपनं टाकलेल्या या डावाबाबत मोठे दावे करत आहे. 


अजित पवार उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत गेलेच नाहीत, तर त्यांचं डील ही मुख्यमंत्रीपदासाठी झाली असल्याचा दावा अनेक मोठ्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याचसंदर्भात एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे की, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. सगळं जुळून आल्यास जुलैमध्येच अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यामुळे आता येत्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की. 


शिंदेंचं महत्त्व कमी करण्यासाठीच अजित पवारांना सामील केलंय; जयंत पाटलांचा दावा 


पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, या घटनाक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ताकद कमी होईल, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच, आता त्यांचे (एकनाथ शिंदे) महत्त्व कमी करण्यासाठी अजित पवारांना आधीच बहुमत असलेल्या सरकारमध्ये समाविष्ट करण्यात आलं असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. 


अजित पवारांना भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाय : पृथ्वीराज चव्हाण 


अजित पवारांना भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाय. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य. 


राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार, राऊतांचं भाकीत


संजय राऊत यांनी अजित पवार यांची भाजपसोबत मुख्यमंत्री पदाची डील झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वारंवार करत आहेत. अजित पवारांच्या शपथविधीनंतर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर निशाणा साधत एकनाथ शिंदेसह 16 आमदार लवकरच अपात्र होणार आहेत, त्यामुळेच राजकारणात ट्विस्ट आला आहे. त्यानंतर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याच भाकीतही राऊतांनी केलं होतं. तसेच, भाजप आणि अजित पवारांमध्ये सीएम पदासाठीच करार झाला असून सध्याचे मुख्यमंत्री लवकरच घरी जातील, याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी आज बोलताना केला आहे.


अजित पवारांच्या रुपात भाजपनं तयार केलाय शिंदेंना पर्याय? 


अजितदादांच्या सोबत येण्यानं एनडीए (NDA) तर मजबूत होईलच, शिवाय भाजपला भागीदार म्हणून शिंदे यांना पर्याय उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत भाजप आता शिंदेंचा पत्ता कट करु शकते, असं बोललं जात आहे.  


महाविकास आघाडीला झटका 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांकडे तब्बल 40 आमदारांचं समर्थन आहे, असा ते दावा करत आहेत. राष्ट्रवादीच्या काही खासदारांचंही त्यांना समर्थन असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या विरोधात उभी असलेल्या महाविकास आघाडीतही फूट पडण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की, लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अशातच अजित पवारांच्या रुपानं भाजपनं खेळलेला नवा डाव त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान, अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवलेली नसून पुन्हा राष्ट्रवादीला बळ देणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काय-काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra NCP Crisis: महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, जयंत पाटलांचा दावा कितपत खरा? अजित पवारांच्या बंडामुळे 2024 पूर्वी भाजपसाठी 'गूड न्यूज'