Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील फुलेनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका आईनेच आपल्याच पोटच्या मुलीला झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जादुटोण्याच्या आहारी गेल्याने या महिलेने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. जादुटोण्याच्या दावा करणाऱ्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्यानंतर आईने हे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शेवटी जखमी अवस्थेत मुलीने घरातून पळ काढत पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वती दादासाहेब हुलमुख (वय 40 वर्षे, रा. गल्ली क्र. फुलेनगर, आंबेडकरनगर) असे आरोपी महिलेच नाव असून, सुप्रिया दादासाहेब हुलमुख (वय 20 वर्षे) असे जखमी मुलीचं नाव आहे. तर, पार्वतीला मुलीला पेटवून देण्याचं सांगणारी शंकुतला आहेर (रा. मिसरवाडी) वर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सुप्रिया हुलमुखच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असल्याने ती आपल्या आई व भावासह फुलेनगरमध्ये राहते. शिक्षणासोबतच ती एका खासगी कंपनीत कंत्राटी म्हणून काम करते. दरम्यान 17 ऑगस्ट रोजी दिवसभर कंपनीत काम करून ती घरी परतली. घरी आल्यावर जेवण करून सुप्रिया नेहमीप्रमाणे रात्री झोपी गेली. मात्र, पहाटे साडेचार वाजता तिला चटक्यांची जाणीव झाल्याने ती खडबडून जागी झाली. तेव्हा तिचे पांघरुण जळत होते. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची आईच तिला पेटवण्याचा प्रयत्न करीत होती. तिची आरडाओरड ऐकून भावाने तिच्या दिशेने तत्काळ धाव घेतली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यात ती गंभीर जखमी झाली आहे. 


जादुटोण्याच्या आहारी गेल्याने केलं कृत्य 


मिसारवाडी परिसरात राहणारी शकुंतला काळी जादू सांगत अनेकांना फसवण्याचे प्रकार करते. सुप्रियाची आई तिच्याकडे जाऊन जादूटोणा करायची. दरम्यान, 'तू जर मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल. तसेच तुझ्या मुलाचे चांगले होईल,' असे शकुंतला आहेर हिने पार्वतीला सांगितले होते. त्यामुळे जादुटोण्याच्या आहारी गेलेल्या पार्वतीने आपल्याच मुलीला झोपेत असतानाच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यात ती वाचली आहे. 


संधी मिळताच सुप्रियाने पोलीस ठाणे गाठले...


या घटनेत सुप्रियाचे केस, खांद्यासह शरीरावर आगीमुळे गंभीर जखमा झाल्या आहे. वेदनांमुळे ती रडत होती. मात्र, याचा पार्वतीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि खोलीच्या एका कोपऱ्यात उभं राहून ती हे सर्व पाहत होती.  दरम्यान, सुप्रियाने घरीच उपचार करत पाच दिवस वेदना सहन केल्या. तर, तिच्या आईने तिला धमकावून घरात डांबून ठेवेले होते. मात्र, आई मंगळवारी बाहेर जाताच तिने थेट सिडको ठाणे गाठले. तसेच पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या; 


Aurangabad : पोलिसांनी चांगल्या वर्तणुकीची संधी दिली, पण बदल झाला नाही; आता थेट कारागृहात रवानगी