Maharashtra CM Letter to PM over Nanar Project : रिफायनरीच्या प्रकल्पावरून आता नवीन आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना 14 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. त्या पत्रात त्यांनी नाणार रिफायनरीसाठी (Nanar Project) लागणारी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा या पत्रामध्ये उल्लेख केल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. 


रत्नागिरीतील नाणार इथला प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळला होता. मात्र आता रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. 14 फेब्रुवारीलाच हे पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


रिफायनरी प्रकल्पासाठी 14 हजार एकर जागा देण्याची सरकारची तयारी असल्याचं समजतंय. त्यामुळे हा प्रकल्प आता रत्नागिरीतच होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. नाणार इथला तेलशुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेनं नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारचं मनपरिवर्तन झाल्यानं या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता नाणारचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच, सध्या पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनीही मोठा चांगला प्रकल्प कोकणात आणणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 


नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर


कोकण दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, "नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्यानं होणाऱ्या मागणीमुळं आपण तिथून तो हलवला आहे. लोकवस्ती असल्यानं नाणारमधून बाहेर हलवण्यात आलं आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन." 


नाणार प्रकल्पाला विरोध दोन मुद्द्यावर होतोय. एक म्हणजे, पर्यावरण आणि दुसरा प्रदूषण. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "रिफायनरीचे प्रस्ताव वारंवार येत असल्याने त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. अशा पद्धतीने योजना आखूनच पुढे जाणार आहोत." तसेच नाणारच्या पर्यायी जागेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "जागा शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. जिथे गावं, वाड्या, वस्त्या नसतील अशीचं गावं पाहत आहोत. कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच जर तो प्रकल्प आला तरच मान्यता देऊ.", असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aaditya Thackeray : नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha