Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी (Nanar Refinery) प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आजच्या दौऱ्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना नाणार प्रकल्पासंदर्भात आदित्य ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं. यावेळी त्यांची सकारात्मक भूमिका दिसून आली आहे. प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेऊ, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरित आयकर विभागाला आढळलेल्या 'मातोश्री' उल्लेखावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


आदित्य ठाकरे म्हणाले की, "नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्यानं होणाऱ्या मागणीमुळं आपण तिथून तो हलवला आहे. लोकवस्ती असल्यानं नाणारमधून बाहेर हलवण्यात आलं आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन." 


पाहा व्हिडीओ : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील विकासाकडे आमचं जास्त लक्ष : आदित्य ठाकरे



नाणार प्रकल्पाला विरोध दोन मुद्द्यावर होतोय. एक म्हणजे, पर्यावरण आणि दुसरा प्रदूषण. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "रिफायनरीचे प्रस्ताव वारंवार येत असल्याने त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. अशा पद्धतीने योजना आखूनच पुढे जाणार आहोत." तसेच नाणारच्या पर्यायी जागेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "जागा शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. जिथे गावं, वाड्या, वस्त्या नसतील अशीचं गावं पाहत आहोत. कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच जर तो प्रकल्प आला तरच मान्यता देऊ.", असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. 


मंत्री आदित्य ठाकरेंच्या राजापूर दौऱ्याआधी जोरदार बॅनरबाजी


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाणारमधील रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी प्रकल्पाविरोधात आणि समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आता आदित्य ठाकरे त्यांना भेटणार का? हे पाहावं लागणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर; राजापुरात रिफायनरी प्रकल्प समर्थक-विरोधकांमध्ये 'बॅनरवॉर'