Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडीचा (Pune Traffic) प्रश्न चांगलाच ऐरणीवर आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील वारजे परिसरात मोठ्या प्रमाात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे पुणेकर चांगलेच वैतागले आहेत. याच संदर्भात आता सुप्रिया सुळेंनीदेखील ट्विट केलं आहे. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढणे गरजेचं असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगदा ते वारजे पूल दरम्यान गेली तीन दिवसांपासून नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि इतर वाहनांची मोठी रांग येथे दिसते. याची कारणे शोधून ही वाहतूक सुरळीत करणे अतिशय आवश्यक आहे. पुणे वाहतूक पोलीस, एन एच ए आय आणि पुणे महापालिका यांनी एकत्रितपणे यावर तोडगा काढणे गरजेचं असल्याचं सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं आहे. 


तासंतास नागरिक वाहतूक कोंडीत अडकले....


रोज कात्रज ते वारजे दरम्यान पुणेकर तासनतास वाहतूक कोंडीत अडकतात. सकाळी आणि संध्याकाळीच नाही तर दिवसभर या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. त्यामुळे नागरिकांचा कामाचा वेळ वाया जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या सगळ्या वाहतूक कोंडींमुळे नागरिक चांगलेच संतापले आहे. पुण्याच्या विकास नेमका कुठे चाललाय?, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 


खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी...


पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगदा ते वारजे पूल दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याच खड्ड्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण होते आहे. दरवर्षी हे सगळे खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र दरवर्षी पुण्यात या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते आणि पुन्हा एकदा महापालिकेचा भोंगळ कारभार समोर येतो. वाहतूक कोंडीच्या तक्रारी पुणेकर ट्विटरच्या माध्यमातून करत आहे. त्यावर महापालिकेकडून आपली तक्रार नोंदवली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्रवर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा दुरुस्ती होत नसल्याचं समोर आलं आहे. 


सूचना, आदेश मात्र परिस्थिती जैसे थे!


पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे आणि त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे आदींच्या अनुषंगाने उपाययोजनांविषयी बैठक झाली होती.  गटारे, नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे तसेच गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले होते. पावसाळी (स्टॉर्मवॉटर) पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वगैरे कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र यंदाही ही कामं पूर्ण करण्यात आली नाही आणि परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. 


हेही वाचा-






Pune news : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरणात 70% पाणीसाठा, संध्याकाळी 5 नंतर नदीपात्रात विसर्ग करणार