मुंबई :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. आक्रमक स्वभाव असलेल्या अजित पवारांचे आज एक वेगळे आणि खूपच खास रूप पहायला मिळाले.   अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत.   कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या अजितदादांचं अनोखं रुप मंत्रालयातील उपस्थितांनी काल अनुभवलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अजितदादांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदारांच्या मुलगी आणि जावयाची  उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. 


त्याचं झालं असं की, उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार पदावर कार्यरत आहेत. येत्या काही दिवसात ते सेवानिवृत्त होत आहेत. चोपदार विलास मोरे यांची मुलगी स्नेहाचं  चार वर्षापूर्वी गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झालं. त्यांचे जावई आयटी कंपनीत अमेरिकेत नोकरीला होते. हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक होतं, मात्र कोरोनामुळं ते पुन्हा भारतात परत आले आहेत. विलास मोरे यांच्या मुलीची आणि जावयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ही इच्छा ते वारंवार मोरे यांच्याकडं व्यक्त करत होते.   


लेकीचा आणि जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची चोपदार विलास मोरे यांची हिंमत होत नव्हती. चोपदारांनी परवा हिंमत करुन त्यांच्या मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचं आहे, असं अजितदादांना सांगितलं. त्यावर अजितदादांनी तात्काळ होकार दिला. वेळापत्रक व्यस्त असूनही  दुसऱ्या दिवशीच भेटायला बोलवलं. दादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी काल अजितदादांची भेट घेतली. चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला फक्त भेट दिली नाही, तर दिलखुलास संवाद साधला. संवाद साधताना अजितदादांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मुंबईत कुठे राहता. कुठल्या शाळेत शिकलात. अमेरिकेत कधी गेलात. अमेरिकेत कुठे राहत होता. तिथं कामाची वेळ, स्वरूप कसं असतं. तिथं छोट्या बाळाला कोण सांभाळतं, असे प्रश्न विचारले. लग्न कसं जमलं, लव्ह की अरेंज मॅरेज ? हा प्रश्नही दादांनी विचारला. दोघांच्या घरच्यांचीही दादांनी आपुलकीनं  चौकशी केली. 


अजितदादांनी केलेलं कौतुक तसंच लेकीचा, जावयाचा हट्ट अजितदादांनी पुरवल्यामुळं सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. तर त्यांची लेक आणि जावई अजितदादांच्या अपुलकीमुळं अक्षरश: भारावून गेले होते. 


महत्त्वाच्या बातम्या :