मुंबई:  चंद्रकांत पाटील यांनी बाबरीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून आज उद्धव ठाकरेंनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.  त्यानंतर आता मनसेच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.


बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये झाला हे म्हणणं चुकीचं आहे. बाबरी मशीद पाडकामाचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केलं होतं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद  चंद्राकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्या दिवशी घडलेला प्रसंग देखील त्यांनी या वेळी सांगितला. हाच प्रसंग सांगणारा व्हिडीओ राज ठाकरे  यांनी पुन्हा शेअर करत दुजोरा दिला आहे.






राज आणि उद्धवमधले मतभेद टोकाचे असले तरी त्यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं चित्रही वारंवार दिसलं आहे. उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली तेव्हा राज त्यांना भेटायला गेले होते. तर काही प्रसंगामध्ये उद्धव यांनी त्यांची पाठराखण केल्याचं दिसलं.  आजही बाळासाहेबांसाठी दोन्ही ठाकरे  पुन्हा एकत्र आल्याचे  चित्र पाहायला मिळत आहे.  बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी  प्रसंग ऐकण्याचे आवाहन केले आहे.  


चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदेंवर तीव्र शब्दात शरसंधान साधलं. बाळासाहेबांचा अवमान करणाऱ्यांसोबत सत्तेत राहायचं असेल तर यापुढे शिवसेना हे नाव वापरू नका आणि बाळासाहेबांचा फोटोही वापरू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेना खडसावलंय. भाजपकडे शौर्य नव्हतं त्यावेळी मुंबई शिवसेनेनी वाचवली आहे. त्यावेळी पंतप्रधानांचं नााव देखील कुठेही नव्हतं.  बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली.  बाबरी मशिदीबाबत ही बातमी आली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा स्वतः राजीनामा द्या, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन