मुंबई : एका बाजूला कोरोनाचे उपचार करताना डॉक्टर त्याच आजाराने मृत पावल्याची केंद्र सरकार अशा डॉक्टरांची आकडेवारी नसल्यचे सांगत आहे. अनेक दिवस कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पावलेल्या डॉक्टरांना शहीद दर्जा देऊन त्यांचा सन्मान करा अशी मागणी डॉक्टरांची शिखर संस्था असेलेली इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य आणि केंद्र सरकारकडे करत आहे. अशाच वातावरणात अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातील डॉ प्रतीक्षा वालदेकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी समाज माध्यमांवर त्या डॉक्टरांना श्रद्धांजली वाहताना 'शहीद' असा उल्लेख केल्यामुळे वैद्यकीय वर्तुळातून ठाकूर यांच्या या भूमिकेबाबत कौतुक केले जात आहे.

Continues below advertisement


32 वर्षाच्या डॉ प्रतीक्षा गेली अनेक दिवस कोरोनाच्या रुग्णांना अमरावती येथील इरवीन हॉस्पिटल येथे उपचार देत होत्या. त्या सात महिन्याच्या गर्भवती असून सुद्धा कोरोना बाधित रुग्णांना उपचार करीत होत्या. एमबीबीएस आणि एमडीचे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ प्रतीक्षा काही दिवसापूर्वी कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करत असताना या आजारानेच संक्रमित झाल्या. काही दिवस त्यांच्यावर याच रुग्णलयात देण्यात आले, मात्र त्यांची तब्बेत बिघडल्यानंतर त्यांना पुढच्या उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गेली 10 दिवस त्यांची तब्बेत चिंताजनक होती त्यांना प्राणवायूही देण्यात आला होता. मात्र रविवारी त्यांचा मृत्यू झाला.


याप्रकरणी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले कि, " आज आपले डॉक्टर योद्धा म्ह्णून काम करीत आहे. आपल्या जीवाची बाजी लावून ते काम करीत रुग्णांना उपचार देत आहे. खासगी आणि शासकीय या दोन्ही क्षेत्रातील डॉक्टर या कोरोना काळात त्यांच्या सेवा बजावत आहे, त्यांचे मनोबल वाढविणे आपल्या सगळ्याचे काम आहे. आज मी अमरावती येथील डॉक्टरांची बैठक घेतली त्यावेळी डॉक्टरांच्या समस्या काही सूचना असतील तर त्या एकूण घेतल्या, तसेच त्यांना काही मदत लागली तर ती करणार असल्याचे सांगितले."


कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना हजारोच्या संख्येने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी या संसर्जन्य आजाराने बाधित झाले, शेकडो डॉक्टरांचा यामध्ये मृत्यू झाला. आजतायगत संपूर्ण देशातून कर्तव्य बजावत असतांना 382 डॉक्टरांचे निधन हे कोरोनामुळे झाले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र शासनाला दिली आहे. त्या संघटनेच्या मते यापेक्षा मृत डॉक्टरांचा आकडा जास्त आहे. तसेच त्यांनी या सर्व डॉक्टरांना शहीदांचा दर्जा द्या, आणि त्यांना केंद्र सरकाने जी योजना जाहीर केली आहे त्या विम्याचे संरक्षण त्यांना द्यावे अशी मागणी केली आहे. मात्र त्यावर कोणतेही उत्तर अजून प्राप्त झालेले नाही.


अमरावती येथील डॉ नीरज मुरके यांनी सांगितले की, "खरंच आमच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर मॅडम या कायम आमच्या पाठीशी उभ्या असतात. आमच्या काही अडचणी असतील तर कायम मदत करत असतात. डॉ प्रतीक्षा याच्या मृत्यूमुळे सगळेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ प्रतीक्षा या शेवटपर्यंत रुग्णसेवा देत होत्या, त्यातच त्यांना कोरोना झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहताना ठाकूर मॅडम यांनी त्या डॉक्टरांचा उल्लेख शहीद असा केल्यामुळे आमच्या सर्व डॉक्टरचे मनोबल उंचावले आहे. गेली अनेक दिवस आम्ही केंद्र सरकारकडे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग होत मृत पावलेल्या डॉक्टरांना 'शहीदांचा' दर्जा द्या आणि विमा संरक्षण द्या ही मागणी सातत्याने करत आहोत. मॅडम यांच्या या उल्लेखाने नवीन पायंडा पडला आहे तो सगळ्यांनीच पुढे न्यावा."


आजच्या घडीला देशातून43 लाख 96 हजार 399 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले याचं सर्व श्रेय हे डॉक्टर मंडळींना आहे. या रुग्णांना बरे करण्याकरिता रोज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ जीवाची बाजी लावून काम करत आहेत. राज्यात एकूणआजपर्यंत एकूण 9 लाख 16 हजार 348 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य प्रमुख डॉ अविनाश भोंडवे सांगतात कि, "गेली अनेक दिवस आम्ही ही मागणी करत आहोत की जे डॉक्टर कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत पावले आहेत त्यांचा यथोचित सन्मान करावा आणि त्यांना शहीदांचा दर्जा द्यावा. कारण हे कोरोना सोबतचे एक मोठे युद्धच आहे अशा वेळी त्यां डॉक्टरना मरण येणे म्हणजे देश सेवेसाठी बलिदान केले असेच आहे. त्यामुळे प्रथम मी आमच्या संस्थतर्फे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आमच्या मृत डॉक्टर सहकाऱ्यांचा श्रद्धांजली वाहताना 'शहीद' असा उल्लेख केल्यामुळे आम्ही सर्व डॉक्टर मंडळी त्यांचे आभारी होत आहोत. त्यांनी हा चांगला पायंडा पाडला असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वांनी अनुकरण करावे हीच विनंती आहे."