मुंबई : कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधाच्या विरोधात आज राज्यभरात ठिकठिकाणी व्यापारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. निर्बंधांचं स्वरुप हे लॉकडाऊनप्रमाणे असल्याचं सांगत अशाने आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असं सांगत व्यापारी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. 


दादर परिसरातल्या व्यापाऱ्यांचं आंदोलन 
सरकारनं घातलेल्या निर्बधांच्या विरोधात दादरमध्ये तीव्र निषेध केला गेला. कपड्याच्या दुकानांपासून ते भांडीकुंड्यांपर्यंत सर्व मोठे व्यापारी दादरमध्ये आहेत. या सर्वांनी आंदोलनानंतर मनसेच्या राजगडाकडे धाव घेतली. मनसेच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची भेट घेतली. यावेळी मनसे सर्व व्यापाऱ्यांच्या पाठिशी आहे असं आश्वासन त्यांनी दिलं. तसेच यातील काही व्यापारी आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला उपस्थित असणार आहेत.


 चेंबूरमधील काही व्यापारी रस्त्यावर 
मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेले दोन दिवस झाले कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.त्यामुळे चेंबूरमधील काही व्यापारी आज रस्त्यावर उतरले आणि शासनाचा निषेध केला. व्यापाऱ्यांनी दिवसातील किमान काही तास दुकान उघडू देण्याची मागणी केली आहे. व्यापारी रस्त्यावर उतरले याची माहिती चेंबूर पोलिसांना मिळताच तिथे पोलिस आले आणि त्यांनी या व्यापाऱ्यांना निघून जाण्यास सांगितले. 


पंढरपुरात व्यापारी आक्रमक, निर्बंध झुगारून दुकाने उघडल्याने कारवाई 
पंढरपुरात प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधाच्या विरोधात आज अनेक व्यापाऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपली दुकाने उघडली. मात्र प्रशासनाने तातडीने कारवाई सुरु केल्याने आता व्यापारी व प्रशासनातील संघर्ष वाढणार आहे. काल व्यापारी असोसिएशनने एक बैठक घेऊन उपाशी मारण्यापेक्षा कोरोनाचे नियम पाळून दुकाने आजपासून उघडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने उघड्या दुकानांना दंडाची पावती फाडत  कारवाई सुरु केल्याने अनेक ठिकाणी वादविवाद होण्यास सुरुवात झाली. चार दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडायची असेल तर कोरोना नसल्याचे तपासणी प्रमाणपत्रे ठेवणे बंधनकारक केल्यावर शहरातील 20 हजारापेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी रांगा लावत ही टेस्ट करून घेतली . आणि दुकाने उघडली होती. मात्र पुन्हा मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्बंध घातल्याने आता पुन्हा व्यापारी आणि प्रशासनात संघर्ष सुरु झाला आहे. एका बाजूला पंढरपूर निवडणुकीसाठी रोज मोठमोठ्या सभा होत असताना कोरोना होत नाही आणि आम्ही पोटासाठी दुकाने उघडल्यावरच कसा कोरोना होतो असा सवाल व्यापारी करीत आहेत. 


ब्रेक दी चेनला अकोल्यात दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी विरोध 
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारच्या ब्रेक दी चेनला अकोल्यात दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी विरोध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यापाऱ्यांनी शेकडोच्या संख्येने मोर्चा काढून राज्यसरकरचा विरोध केलाय. यावेळी व्यापाऱ्यांनी जमावबंदी , सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचा फज्जा उडवला. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शेकडो व्यापाऱ्यांच्या जमावामुळे जिल्ह्यात सरकार ने दिलेली नियमावली लागू आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी लॉकडाउनच्या नियमात बदल करून इतर दुकानांना परवानगी देण्यात आली नाही तर उद्यापासून दुकाने सुरू करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
 
राज्य सरकार विरोधात व्यापारी वर्गाची गांधीगिरी 
राज्य सरकारने काल अचानक महाराष्ट्रमध्ये संपुर्ण लॉकडाऊन केल्यासारखे नियम लावले. याच्या विरोधात व्यापारी वर्गात असंतोष व्यक्त होवू लागला आहे. संपूर्ण लॉकडाऊन केल्यास व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असून यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होणार आहे. त्यामुळे त्वरीत दुकाने उघडण्याचे आदेश सरकारने द्यावेत ही मागणी करण्यासाठी खारघर येथे व्यापारी रस्त्यावर उतरले होते. खारघर येथील उत्सव चौकात सरकारच्या विरोधातील बॅनर घेवून व्यापाऱ्यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. यावेळी ‘जिनो दो जिनो दो.. व्यापारीयों को जिनो दो’ महाराष्ट्र सरकार हाय हाय .. च्या घोषणा देण्यात आल्या . सरकारने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी नाहीतर व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवून लोक आत्महत्या करतील असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.


अहमदनगरमधील व्यापाऱ्यांकडून निषेध
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवेची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र शासनाच्या या निर्णयाचा अहमदनगर मधील व्यापाऱ्यांनी निषेध केलाय. दुकाने बंद करून रस्त्यावर बसून या निर्णयाचा विरोध करून व्यापाऱ्यांनी निषेध केलाय. कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक व्यापारी हे कर्जबाजारी आहेत. त्यात आता पुन्हा दुकाने बंद केली तर व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असे सांगत सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत तरी किमान दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.


व्यापाऱ्यांनी एकत्र येत केला मिनी लॉकडाऊनचा विरोध
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात आज व्यापाऱ्यांनी एकत्र येत मिनी लॉकडाउनचा विरोध केला. या वेळी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने व्यापार सुरु करू देण्याची मागणी केली आहे. शनिवार आणि रविवार व्यापार बंद ठेवून बाकी दिवस व्यापार सुरु ठेवण्याचा निर्णय आधी सरकारने केला होता. पण सरकारने हा निर्णय फिरवल्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास उद्या पासून दुकानं उघडण्याचा व्यापाऱ्यांनी इशारा दिलाय.


बंद विरोधात हिंगोलीतील व्यापाऱ्यांचे आंदोलन 


हिंगोली जिल्ह्यात सातत्याने संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच राज्य शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन उपक्रमाअंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे निर्बंध मागे घ्या अन्यथा आदेश झुगारून आम्ही बाजारपेठ उघडू असा इशारा हिंगोली व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व व्यापाऱ्यांनी आज हातात फलक घेऊन सरकारी निर्बंधांविरोधात आंदोलन केले आहे.या आंदोलन भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर,राष्ट्रवादीचे नेते दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..