मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्या भेटीच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. आज किंवा परवा ही भेट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली.  कोरोना कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायी आणि जनमानसात तीव्र नाराजी आहे.  या सर्व घटकांशी चर्चा करुन निर्णय घेणे अपेक्षित होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे निर्बंध विचार न करता लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावले जातील असं म्हटलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सातही दिवस लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठा असंतोष आहे. यातून मार्ग काढण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 


केंद्र सरकारकडून आवश्यक लसींचा  पुरवठा होतो आहे. मात्र कधीकधी लसी कमी पडतात. आजच्या घडीला महाराष्ट्राला सर्वाधिक लसींचा पुरवठा होत आहे. भारत सरकारशी चर्चा करुन याबाबत मागणी केली पाहिजे. मीडियात येऊन याबाबत बोलणे योग्य नाही. यामध्ये राजकारण होता कामा नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.