Mumbai High Court : मुंबई-पुणे-बंगळुरु या जुन्या महामार्गावरील सोमाटणे (Somatane Toll Plaza) येथील टोल वसूलीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी पार पडलेल्या प्राथमिक सुनावणीनंतर हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावणी आधी 3 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे याचिका?
राष्ट्रीय महामार्ग 48 च्या (मुंबई-पुणे-बंगळुरु) पुणे येथील सोमाटणे फी प्लाझावरील टोल वसुलीला हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटरच्या नियमाचं यात उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेतून केलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क हे (दर आणि संकलनाचे निर्धारण) नियम, 2008 द्वारे अनिवार्य केले आहे. वरसोली टोल प्लाझा (लोणावळा) आणि सोमाटणे (देहू रोड) टोल प्लाझामधील अंतर फक्त 31 किमी एवढंच असल्याचं याचिकेत म्हटलेलं आहे. नियमांनुसार महानगरपालिका किंवा नगर क्षेत्राच्या हद्दीपासून 5 किलोमीटर अंतराच्या हद्दीत टोल प्लाझा स्थापन करण्यास मनाई आहे. सोमाटणे टोल प्लाझा तळेगाव दाभाडे महानगरपालिकेच्या लिंब फाट्यापासून अवघ्या 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सोमाटणे इथली टोल वसुली ही मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचं घोषित करावी अशी मागणी करत ही याचिका तळेगाव येथील मिलिंद अच्युत आणि अविनाश बोडके यांनी वकील प्रवीण वाटेगावकर यांच्यामार्फत हायकोर्टात दाखल केली आहे.
3 लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश
न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर यावर प्राथमिक सुनावणी झाली. याचिकाकर्ते हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील स्थानिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याची माहिती हायकोर्टाला देण्यात आली. तेव्हा, या याचिकेमागील याचिकाकर्त्यांचे सामाजिक हित जाणून घेण्यासाठी हायकोर्टानं त्यांना दोन आठवड्यांत 3 लाख रुपये न्यायालयात अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे निर्देश देत सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.
नियमाचं उल्लंघन केल्याचा दावा
याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाकडे तातडीनं सुनावणीची मागणी केली असून पुढील मुद्दे नमूद केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या मुंबई-पुणे येथील सोमाटणे टोल प्लाझावरील टोल वसुलीला आव्हान दिलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटर असणं अपेक्षित असताना या नियमाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune : पुणे शिवाजीनगर बसस्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ, एसटी बसचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांचे प्रचंड हाल