Angadia Extortion Case : आंगडीया खंडणी वसुली प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी (DCP) सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) पुन्हा फेटाळला आहे. आंगडीया व्यावसायिकांकडून आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा दणका बसला आहे. दरम्यान, खंडणी वसुली प्रकरणात सौरभ त्रिपाठी अनेक महिन्यांपासून फरार असल्याचं समजत होतं. तसेच यापूर्वीही त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मुंबई गुन्हे शाखेने सौरभ त्रिपाठींवर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. अटकेपासून संरक्षणासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.


अटकेपासून कोणताही दिलासा नाही


आंगडीया खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असलेले पोलीस अधिकारी (DCP) सौरभ त्रिपाठी यांना राज्य सरकारने निलंबित केलं आहे. गृह विभागाने राज्य सरकारकडे पाठवलेला निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयाच अर्ज केला होता. तो बुधवारी कोर्टानं फेटाळला आहे. कोर्टाने सौरभ त्रिपाठी यांना अटकेपासून कोणताही दिलासा दिलेला नाही. "माझ्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचं त्रिपाठी यांनी या याचिकेत म्हटलं होतं. मुंबईतील आंगडीयांकडून खंडणी वसूल करण्याचा सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोप आहे. हायकोर्टाचे वकील अनिकेत निकम हे सौरभ त्रिपाठी यांची बाजू सेशन्स कोर्टात मांडली.


कोण आहेत सौरभ त्रिपाठी?


असं म्हणतात की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीनंतर सौरभ त्रिपाठी चर्चेत आले. तर सौरभ त्रिपाठी 2010 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. माहितीनुसार,  मुंबईच्या नायर रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सौरभ त्रिपाठी आयपीएस  बनले. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मुंबईत पोलीस उपायुक्त, मुंबईत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी कर्तव्य बजावलं आहे. 


आंगडियां खंडणी प्रकरण काय आहे?
आंगडीयांच्या संघटनेने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार केली होती. पोलीस अधिकारी पोलीस चौकीत बोलावून पैसे उकळत असल्याची तक्रार अंगडीयांनी केली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीत पोलीस अधिकाऱ्यांनी अंगडीयांना आयकर विभागाचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचं स्पष्ट झालं. पोलीस अधिकाऱ्यांविरोधात चौकशीत पुरावे आढळून आले.