औरंगाबाद : ऑनलाईन तलवारी मागून त्या विक्री करणाऱ्या एका आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जिन्सी पोलिसांनी बायजीपुराभागातून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या ताब्यातून तब्बल 41 तलवारी दोन गुप्ती आणि सहा कुकरी असा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. इरफान उर्फ दानिश खान असे आरोपीचे नाव आहे.
दानिश हा पूर्वी हॉकी विक्रीचा व्यवसाय करायचा. मात्र आता त्याने ऑनलाइन पद्धतीने तलवारी मागवून ती विक्री करण्यास सुरुवात केली होती. पुंडलीकनगर पोलिसांनी त्याच्याकडून कालच सहा तलवारी जप्त केल्या होत्या. दानिशच्या बायजीपुरा येथील घरावर जिन्सी पोलिसांनी छापा मारून 41 तलवारी, 2 गुप्ती, 6 कुकरी असा शस्त्र साठा जप्त केला आहे. त्याने कोणत्या उद्देशाने एवढा मोठा शास्त्राचा साठा ठेवला होता याचा तपास सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उप आयुक्त दीपक गिर्हे यांनी दिली आहे.