अकोला : मराठमोळे कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनं मराठी चित्रपटसृष्टी पार ढवळून निघाली आहे. सापते यांनी शनिवारच्या पहाटे पुण्यातील ताथवडे भागातील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य हे आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं त्यांनी व्हिडीओतून स्पष्ट केलं आहे. 


मौर्या हे आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून मला राकेश मौर्य वारंवार पैशावरून त्रास देत आहेत. मी काही कामगारांचे पैसे देणे लागतो असं सांगून मला त्रास दिला जातोय. वास्तविक मी सर्वांचे पैसे वेळेवर दिेले आहेत. पण असं असूनही हा त्रास दिला जातो. कामगार दिले जात नाही. म्हणून मी एक झीचा प्रोजेक्ट सोडला. दशमी क्रिएशन्सचं कामही मी करतो आहे. पण हा त्रास दिल्यामुळे आता आत्महत्या करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर उरलेला नाही. असं त्यांनी व्हिडीओत म्हटलं होतं. 


Raju Sapte Suicide : यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, कलादिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्या पत्रात खळबळजनक आरोप


'अगोबाई सूनबाई', 'काय घडलं त्या रात्री', 'मन्या द वंडर बॉय', 'साटंलोटं', 'राजधानी एक्स्प्रेस' आदी चित्रकृतींचे कलादिग्दर्शन राजू सापते यांनी केलं आहे. राजू सापते हे अत्यंत सोज्वळ आणि मनमिळावू कलादिग्दर्शक होते. गेल्या 22 वर्षांपासून राजू या विश्वात आपलं काम करत आहेत. अत्यंत शांत मनमिळावू स्वभावामुळे राजू यांच्याकडे काम पुन्हा पुन्हा येत असत. सध्या लॉकडाऊन नंतरच्या काळात राजू सापते यांच्याकडे तब्बल पाच मालिकांचे काम होतं. परंतु, युनियनच्या दहशतीमुळे त्यातलं एक काम आपण सोडून दिल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 


दोषींवर कठोर कारवाई करा : राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आघाडी 
कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि क्रीडा आघाडीने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्या राकेश मौर्या नावाच्या युनियनमधील एका व्यक्तीमुळे राजू यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला, त्याची सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादी चित्रपट विभागानं केली आहे. या प्रकरणातील सर्वच तथ्य शोधून काढण्यासंदर्भात सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितलं. 


राकेश मौर्यने राजू सापते यांचा खून केलाय, त्याच्यावर कारवाई करा; मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी


राष्ट्रवादी चित्रपट विभागाचं शिष्टमंडळ भेटणार गृहमंत्र्यांना
कला दिग्दर्शक राजू सापतेंच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी चित्रपट विभागाचं शिष्टमंडळ बुधवारी किंवा गुरूवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबई येथे भेटणार आहे. या शिष्टमंडळात चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, अभिनेत्री प्रिया बेर्डे, सविता मालपेकर, मेघा घाडगे, अभिनेता विजय पाटकर, गिरीश परदेशी, प्रियदर्शन जाधव, गायिका वैशाली माडे यांच्यासह इतर काही अभिनेते-अभिनेत्री आणि कलाकारांचा समावेश असणार आहे.


चित्रपट क्षेत्रात कुणी त्रास देत असेल तर राष्ट्रवादीच्या चित्रपट विभागाशी संपर्क करा : अभिनेत्री प्रिया बेर्डे
राजू सापतेंच्या आत्महत्या प्रकरणानंतर ख्यातनाम मराठी चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चित्रपट क्षेत्र आणि युनियनमधील कुणी एखाद्याला त्रास देत असेल तर ही बाब राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या लक्षात आणून देण्याचं आवाहन चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केलं आहे. प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी असा त्रास होत असलेल्या लोकांनी स्वत:ला एकटं समजू नये, राष्ट्रवादी चित्रपट विभाग त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली आहे. 


कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; मनोरंजनसृष्टीतली युनियन्सची दहशत पुन्हा उघड


अभिनेत्री सविता मालपेकरांच्या संतप्त भावना
यासंदर्भात ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सविता मालपेकरांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. राजू सापतेंसारख्या चांगल्या माणसाला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावी लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजू यांनी लढायला हवं होतं, त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं, अशी हळवी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रवादी चित्रपट आघाडीच्या माध्यमातून धसास लावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सविता मालपेकर या राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत.