मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे. यापूर्वी लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम असतील असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच काही नव्या नियमांचाही समावेश करण्यात आला आहे. 


राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला असून परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात प्रवेश करण्याआधी 48 तासांपूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या काही राज्यांची यादी जाहीर केली होती. त्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांनाही RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच राज्यात प्रवेश मिळणार आहे. 


पाहा व्हिडीओ : राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला



राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे काल (बुधवारी) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.


राज्यात कोरोनाचा आलेख उतरतोय, बुधवारी 58 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त 


राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.01% एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी 816 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,01,00,958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,26,710 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,13,000 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात बुधवारी रोजी एकूण 5,46,129 सक्रीय रुग्ण आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :