कोल्हापूर : महाराष्ट्र क्रांती सेना हा नवा राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या सर्वा जागा लढवणार आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज कोल्हापुरात ही माहिती दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वच पक्षात राजकारण सुरु झालं आहे. तर याच मुद्द्यावरुन आगामी निवडणूक लढवण्याची तयारी अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. आता महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज सुरेश पाटील यांनी केली आहे.

मराठा समाजातील लोकांना राजकीय व्यासपीठ देण्यासाठी या नव्या राजकीय पक्षाची सुरुवात दिवाळी दिवशी रायरेश्वर मंदिरातून झाली आहे. आगामी काळात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या पक्षातून विविध मान्यवर निवडणूक लढवू इच्छित आहेत.

तसंच येणाऱ्या लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली नाही तर त्यांनी आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार आहे, असंही सुरेश पाटील यांनी सांगितलं.