मुंबई : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच हा प्रयत्न केल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.


नक्षलींनी लिहिलेल्या पत्रांमध्ये दिग्विजय सिंग यांचा मोबाईल नंबर असल्याचं उघड झालं आहे. गरज पडली तर दिग्विजय सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. नक्षलवादी प्रकाश याने सुरेंद्र गडलिंग याला पाठवलेल्या पत्रात दिग्विजय सिंग यांच्या मोबाईल नंबरचा समावेश आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदप्रकरणी सुरु असलेल्या तपासात पुणे पोलिसांनी ही माहिती उघड केली.

'पुणे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. पुणे पोलिस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचारासंदर्भात सुनावणी करताना पुणे पोलिसांचा समाचार घेतला होता. त्यानंतरही पुणे पोलिसांचे अधिकारी माध्यमांशी जाणीवपूर्वक संवाद साधत आहेत. भाजपला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी हाच, त्यांचा हेतू असल्याचं दिसत आहे. पुणे पोलिस सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे प्यादे बनले आहेत' या शब्दात सचिन सावंत यांनी टीकास्त्र सोडलं.

'एके ठिकाणी जिवंत बॉम्बचा साठा सापडल्या प्रकरणी सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठानच्या लोकांना साधे चौकशीसाठी बोलावले जात नाही. तसेच भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे आणि संभाजी यांची साधी चौकशी न करता एल्गार परिषदेचा या दंगलीशी संबंध जोडून त्याची चौकशी केली जात आहे.' असंही सावंत म्हणाले.

शहरी नक्षलवाद हा शब्द राजकीय फायद्यासाठी वापरुन कट्टरतावाद्यांपासून दुसरीकडे जनतेचे लक्ष वळावे हा सरकार आणि भाजपचा प्रयत्न आहे. पुणे पोलिस यात त्यांना मदत करत आहेत. महाराष्ट्राची पोलिस यंत्रणा गुजरात मॉडेलनुसार चालवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, पण गुजरात मॉडेलची कशी वाताहत झाली हे जनतेसमोर आहे. महाराष्ट्र पोलिसांची तशी अवस्था होऊ नये, अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली.