नागपूर : नक्षलवाद्यांच्या पत्रव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. नक्षलींनी लिहिलेल्या पत्रांमध्ये दिग्विजय सिंग यांचा मोबाईल नंबर असल्याचं उघड झालं आहे. गरज पडली तर दिग्विजय सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.
नक्षलवादी प्रकाश याने सुरेंद्र गडलिंग याला पाठवलेल्या पत्रात दिग्विजय सिंग यांच्या मोबाईल नंबरचा समावेश आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदप्रकरणी सुरु असलेल्या तपासात पुणे पोलिसांनी ही माहिती उघड केली.
पुणे पोलिसांनी या खटल्यात प्राथमिक आरोपपत्र सादर केलं आहे. पोलिसांनी दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल क्रमांकाचा तपास सुरु केला आहे. सिंग यांच्या मोबाईलवरुन नक्षलवाद्यांशी काही बोलणं झालं का, याचा तपास सुरु आहे. गरज पडली तर दिग्विजय सिंग यांची चौकशीही करु शकतो, असंही पुणे पोलिसांनी सांगितलं.
दोन महिन्यांपूर्वीही भाजपने दिग्विजय सिंह यांच्यावर नक्षली कनेक्शनचे आरोप केले होते. 'जर मी नक्षली असल्याचा आरोप आहे, तर सरकार मला अटक का करत नाही?' असा प्रतिप्रश्न दिग्विजय यांनी केला होता.