कोल्हापूर : 'महाराष्ट्र केसरी' बाला रफिक शेखनं 'महाराष्ट्र केसरी' प्राप्त केल्यानंतर कोल्हापुरातल्या न्यू मोतीबाग तालमीला भेट देऊन हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना आदरांजली वाहिली. बाला रफिकचं कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर न्यू मोतीबाग तालमीच्या पैलवानांनी त्याचं जंगी स्वागत केलं. बाला रफिकची महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन कोल्हापूर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.


बाला रफिकनं न्यू मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीची बाराखडी गिरवली होती. त्यामुळं त्यानं आपला महाराष्ट्र केसरी किताब आंदळकरांना समर्पित केला आहे. बाला रफिकनं महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर दोनच दिवसांत न्यू मोतीबाग तालमीला भेट देऊन आंदळकरांविषयीचा आपला आदर व्यक्त केला.

जालन्यात झालेल्या 62 व्या वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत  बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुणफरकाने पराभूत केले.

अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान असला तरी बाला रफिकने त्याच्यावर मात केली. तिसऱ्यांदा मॅट विभागाची सेमीफायनल जिंकून अभिजीत फायनलमध्ये पोहोचला होता. परंतु बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने हा सामना एकतर्फी जिंकला.