परभणी : मी मुख्यमंत्र्यांचा सर्वात लाडका मंत्री आहे. मी जे सांगतो ते होतेचं, असे सूचक वक्तव्य शेतकऱ्यांची जमीन लाटण्याचा आरोप करण्यात झाल्यानंतर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांनी परभणीत केले. एवढे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण शेवटी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं. याची कुणी कल्पना केली नव्हती, अशी स्तुतीसुमनेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळली आहेत.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मराठा समाजाच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन आज लोणीकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्याजवळ आपलं किती वजन आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कालच शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याच्या नावाखाली पैसे गोळा करून कारखान्यासाठी खरेदी केलेली जमीन नियमबाह्य आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य कारवाई टाळण्यासाठी तर नाही ना? अशी चर्चा होऊ लागली आहे.

मंत्री लोणीकरांकडून तक्रारकर्त्याला धमक्या 
दरम्यान,  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांच्या मुलाकडून मला धमक्या येत असल्याची तक्रार याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी केली आहे. लोणीकरांनी कारखान्याच्या नावानं शेतकऱ्यांच्या पैशानं जमीन लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या पैशातून चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने जमीन लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार बळीराम कडपे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर साखर आयुक्तांसह जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना नोटीस पाठवली होती. दरम्यान या विषयीचे वृत्त एबीपी माझाने दिल्यानंतर  याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसकडून मंत्री लोणीकरांच्या राजीनाम्याची मागणी
चतुर्वेदेश्वर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांकडून पैसे जमा करून त्या पैशातून कारखान्याची जमीन परस्पर बळकावल्याच्या आरोपानंतर काँग्रेसने मंत्री लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी एकनाथ खडसे यांना वेगळा न्याय आणि लोणीकरांना वेगळा न्याय का? असा प्रश्न करत लोणीकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची  मागणी केली आहे. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या जालना येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून उद्या लोणीकरांच्या कामाचा भांडाफोड करणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले आहे.