Maharashtra Jalgaon Politics :  राज्यात शिंदे गट (CM Eknath Shinde) आणि भाजप (Maharashtra BJP) युतीच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर सुद्धा झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर तसेच विरोधी पक्ष नेतेपद हाताशी असताना ही शिवसेनेला (Shivsena) महत्वपूर्ण निर्णयांवर मंजुरीसाठी भाजपवर अवलंबून राहण्याची वेळ आली असल्याचे पाहायला मिळत आहे.


शिवसेनेत शिंदे गटाने बंडाळी करत सरकार स्थापन केल्याने त्याचा परिणाम जळगाव मनपामध्ये (Jalgaon Mahapalika) पाहायला मिळत आहे. बहुमतात असलेली उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना अल्पमतात आल्याने महापौर आणि विरोधी पक्ष नेता हाताशी असतानाही मनपामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेताना आता भाजपची हांजी हांजी करण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळत आहे.


राज्यात शिंदे गट आणि भाजप युतीतील सरकार असल्यामुळे जळगाव महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचे पहायला मिळत आहे. महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असली त्यांच्याकडे आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी बहुमत नसल्याने विकासकामांच्या ठरावासाठी सत्ताधारी शिवसेनेला भाजपची मनधरणी करावी लागत आहे. 


महापालिकेवर उद्धव ठाकरे समर्थक असलेल्या शिवसेनेची सत्ता


महापालिकेवर उद्धव ठाकरे समर्थक असलेल्या शिवसेनेची सत्ता असून जयश्री महाजन या महापौर आहेत. बंडखोर भाजपचे नगरसेवक म्हणून शिवसेनेकडे केवळ 22 नगरसेवक आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट मिळून 50 ते 55 नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ता असून शिवसेना अल्पमतात आली असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेकडे महापौर, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेते पद असलं तरी शिवसेनेला महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाला सोबत घ्यावे लागणार असल्याचे पहायला मिळत असून हीच संधी समजून महापालिकेत भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


बंडखोर पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपत परतले


शिवसेनेने ज्या बंडखोरांच्या जोरावर शिवसेनेने महापालिकेवर सत्ता मिळवली ते बंडखोर पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपत परतले आहेत, त्यामुळे महापालिकेत  भाजप बहुमतात आल्याने भाजपच्या नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सभागृहात कुठलाही ठराव मांडताना किंवा इतर महत्वपूर्ण निर्णयासाठी सत्ताधारी शिवसेनेने भाजपला गृहीत धरू नये असे स्पष्ट मत भाजपच्या नगरसेविका ॲड. सुचेता हाडा यांनी व्यक्त केलं आहे.
 
महापालिकेत भाजप विरोधात आहे. त्यांच्याकडून आता अशाच पध्दतीने अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न होईल. ही त्यांची राजकीय खेळी असल्याच मत शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केलं आहे.