जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेच्या काही सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकाऱ्यांसमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने, काही लोकांनी हस्तक्षेप करत त्यांच्या हातून पेट्रोलचे कॅन हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला. गेल्या सहा महिन्यांपासून पगार रखडल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.


वरणगाव नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बेताची, त्यात पगार रखडल्याने सफाई कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रखडलेले पगार करावेत, यासाठी कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी नगरपालिकेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेत जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


चर्चा फिस्कटल्याने उडाला गोंधळ


थकीत पगाराच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी शुक्रवारी दुपारी नगरपालिकेत आलेले होते. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी पगाराच्या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली. परंतु, मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने संतप्त झालेल्या काही सफाई कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर थेट स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे नगरपालिकेच्या आवारात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, कर्मचाऱ्यांना थकीत पगार मिळाले नाहीत तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.