Devendra Fadnavis : परदेशातील उद्योगांद्वारे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (FDI) महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्राने (Maharashtra) इतर राज्यांना मागे टाकलं. या आर्थिक वर्षात एक लाख 18 हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले असं बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. उद्योग बाहेरच्या राज्यात गेले आहे. त्याचा राज्याला फटका आहे. म्हणून श्वेतपत्रिका काढा त्यात परकीय गुंतवणूक वाढली तर अभिनंदन करु अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे.
गुजरात, कर्नाटकला मागे टाकून महाराष्ट्र पुन्हा नंबर वन
2020 ते 2022 या काळात महाराष्ट्राचा क्रमांक घसरला होता. मात्र 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख 18 हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली. 2021-22 च्या तुलनेत हा आकडा 4 हजार कोटींनी अधिक आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने नुकतीच परकीय गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकून पहिला क्रमांक पुन्हा पटकावल्याचं स्पष्ट झालं आहे.
'उद्योग गेले हे बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली'
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याने आज केंद्र सरकार आणि खासगी कंपन्यांसोबत पंप स्टोअरेज संदर्भात 13 हजार 500 मेगावॅटचे करार केले. याद्वारे 71 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर 30 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. पंप स्टोअरेज हा जगात सर्वात अपारंपरिक स्त्रोत म्हणून स्वीकारला आहे. हा सर्वात मोठा करार आहे. कालच एफडीआयचे आकडे जाहीर झाले आहेत. 2020-21 मध्ये गुजरात तर 2021-22 मध्ये कर्नाटक नंबर वनवर गेला. आता महाराष्ट्र नंबर वनवर गेला आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे गेले हे बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत.
VIDEO : Devendra Fadnavis Full PC : परदेशी गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र पहिला : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली?
देशात गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात सुमारे चार लाख कोटींची विदेशी गुंतवणूक आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. देशात राज्याचा पहिला क्रमांक आहे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2023 या काळात महाराष्ट्रात चार लाख सात हजार कोटींची एकत्रित गुंतवणूक झाली. याच काळात कर्नाटकात 24 टक्के, गुजरातमध्ये 17 टक्के तर 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो.
श्वेतपत्रिका काढा, परकीय गुंतवणूक वाढलेली दिसली तर अभिनंदन करु : अजित पवार
दुसरीकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना सरकारचा नंबर वनचा दावा मान्य नाही. राज्यातले उद्योग बाहेरच्या राज्यात गेले. त्यामुळे रोजगार बुडाला. राज्याला फटका बसला. आधी उद्योगांवरची श्वेतपत्रिका काढा, त्यात परकीय गुंतवणूक वाढलेली दिसली तरच सरकारचे अभिनंदन करु, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमधला दावा आणि प्रतिदाव्याचा कलगीतुरा रंगणारच आहे. हेही खरं आहे की महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उद्योग जगतात प्राधान्य असलेलं राज्य होतं, आहे. पण याच राज्यात उद्योजकांना खंडणीखोरी, कंत्राट मागणारे, महागडी वीज, लालफितीचा त्रास आहे. त्यामुळेच परदेशी गुंतवणूक वाढली असं जरी दिसलं तरी प्रत्यक्षात ती गुंतवणूक अस्तित्वात आली का आणि रोजगार मिळाला का याचं प्रमाण सुद्धा तपासून बघायला हवं.