मुंबई : बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय शुक्रवारी (11 जून) जारी करण्यात आला. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.


राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीची परीक्षा देखील रद्द (Maharashtra HSC 12 th Exam Canceled) करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं.


बारावीच्या परीक्षेचं महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करुन पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होतं, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.


ISC Class 12 Exam Cancelled: सीबीएसई पाठोपाठ आता आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षाही रद्द


Maharashtra Board Exam Update : शिक्कामोर्तब! अखेर राज्यातील इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, बैठकीत प्रस्ताव मंजूर


सीबीएसई बारावी परीक्षा रद्द करण्याबाबत मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ते म्हणाले होते की, "मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला."